'मी औरंगाबादकर'; नामांतरविरोधी मोर्चात तरुणाईचा उत्साह, भर पावसात निघाला मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 08:09 PM2022-07-12T20:09:31+5:302022-07-12T20:12:16+5:30
‘आम्ही औरंगाबादकर, हमारा औरंगाबाद, तारिखी औरंगाबाद’ अशा अनेक फलकांसह तरुण तिरंगा झेंडा घेऊन उपस्थित होते.
औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा ठराव मागील महिन्यात राज्य सरकारने घेतला. या निर्णयाविरोधात शहरात सर्वपक्षीय नामांतरविरोधी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. समितीने मंगळवारी दुपारी भडकलगेट ते आमखास मैदानापर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन केले. मोर्चात तरुणाईची लक्षणीय उपस्थिती होती. ‘मी औरंगाबादचा, औरंगाबाद माझे’ यासह ‘आय लव्ह औरंगाबाद’ अशा अनेक फलकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दुपारी दोन वाजता सुरू होणारा मोर्चा फारशी गर्दी न जमल्यामुळे तीन वाजता सुरू झाला. टाऊन हॉल उड्डाणपूल ओलांडून मोर्चा थेट आमखास मैदानात दाखल झाला. ‘आम्ही औरंगाबादकर, हमारा औरंगाबाद, तारिखी औरंगाबाद’ अशा अनेक फलकांसह तरुण तिरंगा झेंडा घेऊन उपस्थित होते. दुपारपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. त्यानंतरही मोर्चातील गर्दी कमी झाली नाही. उलट वाढत गेली. यावेळी एमआयएमचे माजी शहराध्यक्ष शारेख नक्षबंदी, माजी नगरसेवक महेंद्र सोनवणे, गंगाधर ढगे, नासेर सिद्दीकी, कुणाल खरात, अय्युब जहागीरदार, शुकूर सालार, आदींनी मार्गदर्शन केले. शेख अहेमद यांनी संचालन केले.
खा. जलील यांची शरद पवारांवर टीका...
राज्य शासनाने शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादच्या नामांतराचा ठराव मंजूर केला त्यावेळी, हा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आल्याच शरद पवार म्हणाले होते. मात्र, त्यांनतर शरद पवार काल औरंगाबादमध्ये असतांना म्हणाले की, आम्हाला माहितच नाही काय ठराव घेतला. आम्हाला याबाबतीत काहीच माहित नसल्याचे म्हणाले. हे म्हणजे झूठ बोले कंव्वा कांटे असे आहे, अशी टीका खा. इम्तियाज जलील यांनी यावेळी केली.