मला विकास कामांची घाई; फक्त कुदळ मारायला आलो नाही, काम पूर्ण करणार: उद्धव ठाकरे
By मोरेश्वर येरम | Published: December 12, 2020 03:54 PM2020-12-12T15:54:16+5:302020-12-12T16:06:15+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजनेसह इतर काही महत्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
औरंगाबाद
"मला विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगाने करायचा आहे. केवळ भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाही. काम पूर्ण करायला आलोय", असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजनेसह इतर काही महत्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर जनतेशी संवाद साधला.
"निवडणुका आल्या म्हणून मी विकास कामे करायला आलो नाही. कोविडमुळे ही कामे रखडली होती. आता थोडा प्रार्दुभाव कमी झाला आहे. त्यामुळे आता कामं वेगानं होतील. महामार्गांचं काम पूर्ण झालं तर औरंगाबादचा विकास अधिक वेगाने होईल", असं उद्धव ठाकरे म्हणाले. "औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजना रखडली होती. कुणामुळे रखडली होती हे माहीत नाही. पण माझ्या प्रयत्नाने का होईना कुणाची तहान भागत असेल तर ते पुण्यही महत्वाचं आहे", असंही ते पुढे म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक त्यांच्या लाडक्या शहरात होत आहे. नुसता पुतळा नाही उभा करणार. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीमध्ये संभाजीनगरला दिलं ते प्रखर हिंदुत्ववाद, राष्ट्रीयत्व विचार सांगणारे ते स्मारक असेल. "हिंदुत्त्व म्हणजेच राष्ट्रीयत्व" हे नेमकं काय आहे, हे त्यामध्ये कळेल. pic.twitter.com/KsokqFwDH0
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 12, 2020
बाळासाहेबांचं स्मारक उभारणार
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार असल्याचीही घोषणा केली. "येत्या २०२५ पर्यंत औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारलं जाईल. या स्मारकात नुसता पुतळा नसेल तर या स्मारकातून अनेकांना हिंदुत्वाची प्रेरणा मिळेल", असं उद्धव ठाकरे म्हणाले.