खैरेंच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:41 AM2017-10-15T01:41:58+5:302017-10-15T01:41:58+5:30
एकमेकांवर चिखलफेक करीत पाण्यात पाहणारे खा. चंद्रकांत खैरे आणि आ. हर्षवर्धन यांच्यात समेट झाल्याची घोषणा दोघांनीही नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार समारंभात दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एकमेकांवर चिखलफेक करीत पाण्यात पाहणारे खा. चंद्रकांत खैरे आणि आ. हर्षवर्धन यांच्यात समेट झाल्याची घोषणा दोघांनीही नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार समारंभात दिली. आ. जाधव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत खा. खैरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले, तर खैरे यांनी यापुढे जाधव हे केवळ शिवसेनेचे सत्कार स्वीकारतील, असा आशावाद व्यक्त केला.
शिवसेनेतर्फे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांच्या सत्काराचे आयोजन तापडिया नाट्यगृहात केले होते. या कार्यक्रमाला अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. खा. खैरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रणीत गटाकडून निवडून आलेल्या ९६ सरपंचांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार संजय सिरसाट, हर्षवर्धन जाधव, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, सुहास दशरथे, महापौर पदाचे उमेदवार नंदकुमार घोडेले, कला ओझा, सुनीता आऊलवार, रंजना कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
या सत्कार समारंभात आ. जाधव यांची उपस्थिती सर्वांनाच कोड्यात टाकणारी होती. आ. जाधव यांना सर्वात अगोदर बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी आता सर्व वाद निकाली निघाले असल्याचे सांगताच नाट्यगृहात हास्यकल्लोळ निर्माण झाला. कन्नड तालुक्यातील निवडून आलेल्या शिवसेनेच्या सरपंचांना प्रत्येक पाच लाख रुपयांचा आमदार फंड देणार असल्याचे सांगितले. मध्यंतरी खैरे यांच्यासोबत नाराजी होती. त्याची कारणे वेगळी आहेत. ती नाराजी मातोश्रीवर गेल्यामुळे दूर झाली आहे. आता लोकसभा निडणुकीच्या वेळी खैरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही जाधव यांनी दिली. आमदार सिरसाठ यांनीही शिवसेनेला अंतर्गत कुरघोडीच्या घटना नवीन नसल्याचे सांगितले. उलट आ. जाधव यांना लवकर कळले. कधी-कधी खैरे-कदम, खैरे-सिरसाठ, सिरसाठ-दानवे, असा संघर्ष झाल्याचे रंगविले जात असल्याचे सिरसाट म्हणाले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सरपंच निवडणुकीत शिवसेनाच वरचढ ठरल्याचे सांगितले. सरपंचाचा आकडा लवकरच १०० पेक्षा अधिक होईल.
सध्या शिवसेनेचे ९६ सरपंच आहेत. आणखी पाच-सहा जणांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही दानवे म्हणाले. शेवटी बोलताना खैरे म्हणाले, बºयाच दिवसांनी पुन्हा सामील झालेले हर्षवर्धन जाधव यांनी आता शिवसेनेचे सत्कार स्वीकारावेत. दुसºया पक्षाच्या मंचावर जाण्याची त्यांना गरज नसल्याचे सांगितले. पक्षात भांडणे चांगली असतात
नुकतीच दोघींची भांडणे (महिला पदाधिका-यांची हाणामारी) झाली होती, या घटनेची आठवणही खैरे यांनी यावेळी करून दिली.