मी तुमच्याशीच एकनिष्ठ आहे हो..! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतले जात आहेत प्रतिज्ञापत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 01:54 PM2022-07-12T13:54:00+5:302022-07-12T13:55:02+5:30
खरी शिवसेना नेमकी कुणाची; याविषयी कायदेशीर लढाई लढली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केल्यानंतर खरी शिवसेना कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून १०० रुपयांच्या बॉण्डपेपरवर नोटरी करून पक्षनिष्ठेविषयी शपथपत्र लिहून घेतले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्ह्यातील पाच आमदारांनी बंड केल्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडेल, अशी चर्चा होती. मात्र सामान्य शिवसैनिक शिवसेना पक्षासोबत राहिल्याने बंडखोर आमदारांसोबत बोटावर मोजता येतील, एवढेच लोक गेले. एकनाथ शिंदे यांच्यासह त्याच्यासोबत गेलेल्या आमदारांनी खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला. यामुळे खरी शिवसेना नेमकी कुणाची; याविषयी कायदेशीर लढाई लढली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईत जाऊन मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. एवढेच नव्हे तर शहरातील गटप्रमुख, सहगटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांची १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर नोटरी करून शपथपत्र लिहून घेतले जात आहे.
काय आहेत शपथपत्रातील मजकूर?
‘माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्त्वावर अढळ निष्ठा आहे. प्रतिज्ञापत्रात असेही नमूद आहे की, आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. आणि या निष्ठेची पुनश्च: पुष्टी करीत आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन, याची या प्रतिज्ञापत्राद्वारे ग्वाही देत आहे. प्रतिज्ञापत्रातील मजकूर सत्य आणि बरोबर आहे. त्यातील कोणतीही माहिती असत्य नाही. तसेच कोणतीही सत्यस्थिती लपविण्यात आलेली नाही.’