‘मी खासदार, घरात दोन नगरसेवक; तरीही माझ्या घरात पाणी नाही’; खासदार खैरे यांची महापौरांवर आगपाखड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:49 AM2018-09-14T11:49:10+5:302018-09-14T11:57:21+5:30
खासदार खैरे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह मनपाच्या अधिकाऱ्यांवर संताप करून सर्वांची परेड घेतली.
औरंगाबाद : शिवसेना नेते खा.चंद्रकांत खैरे यांच्या घरी चार दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांनी गुरुवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह मनपाच्या अधिकाऱ्यांवर संताप करून सर्वांची परेड घेतली. जेव्हा स्वत:च्या घरी अडचण येते, तेव्हा सामान्यांचे काय हाल होत असतील, याची जाणीव आज खा.खैरेंना झाली.
शहरात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर खा.खैरेंनी मनपाच्या अधिकाऱ्यांना आणि महापौरांना चांगलेच फैलावर घेतले. राजाबाजार येथे संस्थान गणपतीची खैरेंच्या हस्ते आरती होती. महापौरांचे आगमन होताच खैरे भडकले. मी खासदार आहे, माझ्या घरात दोन नगरसेवक असताना पाच दिवसांपासून घरात पाणी येत नाही. पाणीपुरवठा विभागाला शिस्त लावा.
रस्त्यांवर खड्डे, बंद पथदिव्यांबाबत त्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर महापौरांनी संतोषीमाता मंदिरात तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. पॅचवर्कवर सुमारे तीन कोटी रुपयांचा चुराडा आजवर केलेला आहे. तरीही प्रमुख रस्ते खड्ड्यात आहेत. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याचे आदेश महापौर घोडेले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना दिले होते.
खड्डेमय रस्त्यानेही संताप
गुरुवारी गणरायाचे स्वागत मात्र खड्डेमय रस्त्यांनी केले. त्यामुळे खैरे यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे महापौरांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश महापौरांनी अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी यांना दिले.