मी शर्यतीत नाही...; पंतप्रधानपदाबाबत शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 06:06 AM2023-06-08T06:06:17+5:302023-06-08T06:06:37+5:30
२०२४ मध्ये बदल घडेल, हा विश्वास आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : निवडणूकच लढवत नसल्याने पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असण्याचा प्रश्न नाही. आधी एकत्र येणे गरजेचे आहे. नेता कोण व पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, हे नंतर पाहता येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले.
बुधवारी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, राष्ट्रवादी कट्टर भाजप विरोधी आहे. पाटणा येथील विरोधी पक्षांच्या एकजुटीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. कालच यासंदर्भात नितीशकुमार यांचा मला फोन आला होता, असे सांगत पवार यांनी नमूद केले की, नितीशकुमार यांच्यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे. ते आमच्याबरोबर आहेत.
नितीन गडकरी हे चांगले मंत्री असून ते मंत्रिपदाला न्याय देतात. ते पक्षीय दृष्टिकोन ठेवत नाहीत, असे सांगत पवार यांनी गडकरींचे कौतुक केले.
दलितांना संरक्षण देण्याची गरज
दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासींनाही संरक्षण देण्याची गरज आहे. सरकारचे ते काम आहे, असे नांदेड येथील अक्षय भालेराव खूनप्रकरणी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी स्पष्ट केले.
बीआरएसकडे दुर्लक्ष करता येणार नाही
बीआरएसच्या अनुषंगाने पवार म्हणाले, जे लोक बीआरएसमध्ये जाताहेत ते पाहता फार चिंता करण्याची गरज नाही; पण बीआरएसकडे डोळेझाकही करू शकत नाही. ब्रिजभूषण सत्ताधारी खासदार त्यांची चौकशी होतेय ही समाधानाची बाब, असे एका प्रश्नाच्या उत्तरात पवार यांनी सांगितले.
ट्रेंड भाजपविरोधी
देशातला ट्रेंड भाजपविरोधी आहे. उत्तर प्रदेश, आसाम, गुजरातमध्ये भाजप आहे. देशातल्या अन्य राज्यांमध्ये भाजप नाही. २०२४ मध्ये बदल घडेल, हा विश्वास आहे, असेही पवार यांनी ठासून सांगितले. महाराष्ट्रात विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका एकत्रित होतील, असे वाटत नाही, असे सांगून पवार यांनी निवडून येण्याची क्षमता पाहून जागावाटपाची चर्चा सुरू होईल, असे नमूद केले.