बंद झाले नेत्र माझे, पाहीन तुझ्यात मी
By Admin | Published: June 10, 2014 12:04 AM2014-06-10T00:04:23+5:302014-06-10T00:15:57+5:30
भारत दाढेल, नांदेड आयुष्य संपले तरी उरलो तुझ्यात मी, बंद झाले नेत्र माझे, पाहीन तुझ्यात मी़़़
भारत दाढेल, नांदेड
आयुष्य संपले तरी उरलो तुझ्यात मी, बंद झाले नेत्र माझे, पाहीन तुझ्यात मी़़़
मृत्यूनंतर आपले नेत्र दान करून दुसऱ्यांना दृष्टी देण्याचे कार्य सर्वच धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले आहे़ परंतु दृष्टीदानाची जनजागृती समाजमनात अजूनही खऱ्या अर्थाने रूजली नाही़ दृष्टीदान दिनानिमित्ताने मराठवाडा नेत्रतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ़ श्याम तेलंग यांनी दृष्टीदानाविषयी माहिती दिली़
दृष्टीदान दिवस का साजरा करतात?
- १० जून हा राज्य शासनातर्फे दृष्टीदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो़ हा दिवस डॉ़ भालचंद्र या सरकारी सेवेतील डॉक्टरचा जन्मदिन आहे़ त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या कार्याची आठवण सर्वांना रहावी म्हणून या दिवशी दृष्टीदान या विषयावर विविध कार्यक्रम घेण्यात येतात़ एखाद्या शासकीय अधिकाऱ्याचा जन्मदिन शासन स्तरावर साजरा होणे ही घटनाच दुर्मिळ आहे़ डॉ़ भालचंद्र यांनी आपल्या तीस वर्षाच्या वैद्यकीय सेवेत ८० हजार नेत्रशस्त्रक्रिया केल्या़ त्यावेळी कोणतीही यंत्रसामग्रीचा शोध लागलेला नव्हता़ लोकांमध्ये आॅपरेशनबद्दल प्रचंड भीती होती़ अशावेळी आर्थिक लाभाची अपेक्षा न करता त्यांनी नेत्ररूग्णांच्या सेवेसाठी आयुष्य झिजवले़
नेत्रदान कोण करू शकतो?
- नेत्रदान हे मृत्यूनंतरच करता येते़ एखाद्याने नेत्रदान करण्यास संमती दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांच्या समंती आवश्यक असते़ कोणत्याही वयोगटातील व कोणताही आजार (उदा़ मधुमेह, कॅन्सर ) असलेल्या व्यक्तीला नेत्रदान करता येते़ सर्वच धर्मात नेत्रदानाला महत्व आहे़ त्यामुळे कोणताही व्यक्ती नेत्रदान करू शकतो़ नेत्रदान हे विनामुल्य आहे़ नेत्रदान संमतीपत्र दिल्यानंतर त्या व्यक्तीस प्रमाणपत्र देण्यात येते़
नेत्रदानाचा उपयोग कोणाला होतो ?
- नेत्रपटल पारदर्शक असते़ ते जर धुसर झाले असेल किंवा डोळ्यात टीक पडली असेल, अशा रूग्णांना दृष्टीदानाचा उपयोग होतो़
नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण किती ?
- देशात वर्षभरात जवळपास ४० हजार लोक नेत्रदान करतात़ तर २० लाख लोकांना नेत्रदानाची गरज आहे़ नांदेड जिल्ह्यात नेत्रदानाच्या संदर्भात विशेष जागृती नाही़ वर्षभरातील नेत्रदान करणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे़ नेत्रदानाविषयी समाजातील गैरसमज दूर करण्याची गरज आहे़
नेत्रदान कसे करतात ?
^- नेत्रदानासाठी मृतदेहाची हलवाहलवी करण्याची गरज नाही़ नेत्रदान करणारा व्यक्ती मृत झाल्यानंतर शासकीय रूग्णालयात फोन केल्यानंतर काही वेळेतच डॉक्टरांचे पथक येऊन नेत्र काढले जाते़ डोळे काढल्यामुळे चेहरा विद्रूप होत नाही़ डोळे झाकलेले दिसतात़ २४ तासांत नेत्र काढले जाते़ मात्र उन्हाळ्यात सहा तासांच्या आत नेत्र काढणे गरजेचे आहे़
शासनाकडून कोणत्या मागण्या आहेत ?
- बेवारस प्रेतांचा उपयोग नेत्रदानासाठी करण्यात यावा़ असा कायदा श्रीलंकेत आहे़ नेत्रदानाची माहिती शालेयस्तरावर पाठ्यपुस्तकात करण्यात यावा, अशी मागणी मराठवाडा नेत्रतज्ज्ञ संघटनेकडून होत आहे़