'करिअर करण्यासाठी राजकारणात आलो नाही'; राजू शेट्टी यांनी नाकारली चंद्रशेखर रावांची ऑफर!
By स. सो. खंडाळकर | Published: February 14, 2023 12:47 PM2023-02-14T12:47:41+5:302023-02-14T12:48:22+5:30
‘आमचं अस्तित्व संपवायचं नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून लढायचंय...’
औरंगाबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांनी दिलेली ऑफर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी नम्रपणे नाकारली. आम्हाला आमच्या संघटनेचं अस्तित्व संपवायचं नाही. करिअर करण्यासाठी मी राजकारणात आलो नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यासाठी लढा द्यायचा आहे, अशी आपली भूमिका स्पष्टपणाने ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी मांडली. पैठण येथे सोमवारी दिवसभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर ते ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी मोबाइलवरच बोलले.
राव माझे जुने मित्र.....
त्यांनी सांगितले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव काही दिवसांपूर्वी मला भेटले. ते माझे जुने मित्र आहेत. कारण २००९ ते २०१४ या काळात आम्ही एकत्र लोकसभेत काम केले आहे. छोटी राज्ये झाली पाहिजेत, ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची असल्यामुळे त्यांच्या तेलंगणाच्या संघर्षाला माझा नेहमीच पाठिंबा राहिला होता. त्यांनी मला भारत राष्ट्र समितीमध्ये येऊन महाराष्ट्राचे प्रमुख पद घेण्याची विनंती केली होती. परंतु ती मी नम्रपणे नाकारली आहे.
चार प्रस्थापित पक्ष सोडून आघाडी व्हावी....
महाराष्ट्रातील चार प्रस्थापित पक्ष सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आघाडी होत असेल तर त्याचा घटक पक्ष व्हायला आम्ही तयार आहोत. मुळात आमचं राजकारण शेतकऱ्यांसाठी आहे. करिअर करण्यासाठी नाही. त्यामुळे यापूर्वी आलेल्या ऑफर्स मी नाकारलेल्याच आहेत, असे त्यांनी नमूद केले.
रावांचे मुद्दे चांगलेच; पण.....
त्यांनी सांगितले की, चंद्रशेखर राव यांचे मुद्दे चांगले असले तरी सध्याच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करून सभागृहात जाण्याची क्षमता असणारे फार कमी लोक आहेत आणि त्यांनी कुठल्या पक्षात गुंतून पडू नये, स्वतंत्रपणे काम करावे, या मताचा मी आहे. तुमची ऑफर स्वीकारली तर कदाचित चळवळीचं नुकसान होईल, हे मी चंद्रशेखर राव यांना सांगितले आहे. तुमच्या कार्यक्रमाला आमचा पाठिंबा आहे. तुमचे मुद्दे चांगले आहेत; पण कुणाच्या पक्षात जायचं नाही, असे राव यांना स्पष्ट सांगितले असल्याचे शेट्टी म्हणाले.
२२ फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम
३७ टक्के वीज दरवाढीला विरोध, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवा, कांद्याचे गडगडलेले दर, कापूस व सोयाबीनचे दर, पीक विम्याचे पैसे, कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ द्या, बुलडाणा येथील शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांची खातेनिहाय चौकशी इ. मागण्यांसाठी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वा. राज्यभर सर्वत्र प्रमुख रस्त्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी सोमवारी पैठणच्या बैठकीत केली.