मी सर्वांचीच कामे करतो,सर्वच पक्षात माझे मित्र.. खैरेंनी न केलेल्या कामांची यादी भली मोठी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 11:01 PM2019-02-01T23:01:35+5:302019-02-01T23:03:39+5:30
शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी सतीश चव्हाण सरसावले.
औरंगाबाद - "पवार ब्रिगेड'चे विश्वासू शिलेदार आ. सतीश चव्हाण राष्ट्रवादी कांग्रेसची उमेदवारी मिळवून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उतरण्याच्या जोरदार तयारीला लागले आहेत. खा.खैरेंनी न केलेली कामे हेच त्यांच्या प्रचाराचे मुख्य सूत्र राहील असाच सूर त्यानी "लोकमत" शी केलेल्या बातचीतीत उमटला.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम माझ्याकडून होईल. गेल्या 35 वर्षांपासून औरंगाबाद येथे शिवसेनेचा खासदार येथे आहे, त्यास केवळ 13 महिन्यांचा अपवाद आहे. माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतो, त्यामुळे कदाचित थोडाफार फरक जाणवेल, पण आमच्या पक्षाला त्याचा फायदाच होईल. खैरेंविरोधात लढताना, विकास हाच मुद्दा माझ्यापुढे अग्रस्थानी राहिल. गेल्या 20 वर्षात खैरेसाहेबांनी केलेल्या कामांपेक्षा न केलेल्या कामाचीच यादी मोठी आहे, असे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना म्हटले.
पाहा व्हिडीओ -
लोकसभा निवडणुकींसाठी मी लोकांपुढे तेच मुद्दे घेऊन विकास हाच माझ्या कामाचा प्राथमिक मुद्दा असेल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील संपर्काबाबत विचारले असता, मी पदवीधर मतदारसंघाचा आमदार आहे. 8 जिल्हे 78 तालुक्यांचा आमदार असताना मला सर्वच जिल्हा आणि तालुक्यांना न्याय द्यावा लागतो. मला मुंबईला जावं लागते, औरंगाबाद शहरातही थांबावे लागे. मी औरंगाबाद शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र पोहोचलो आहे. माझा संपर्क कमी झाला, असे म्हणण्यापेक्षा कामाचं स्वरुप आता बदललंय असे म्हणावे लागेल. कारण, मी औरंगाबाद शहराच्या मुलभूत गरजांकडेही दुर्लक्ष होऊ दिलं नाही, आपण माझे विधिमंडळातील भाषणं वाचल्यास आपणास ही बाब लक्षात येईलच असे चव्हाण यांनी सांगितले. तसेच औरंगाबादला आणण्यात येणारे राष्ट्रीय दर्जाचे इंस्टीट्युट हे सरकार आल्यानंतर विदर्भात नेण्यात आल्या. याबाबत, सर्वपक्षीय आमदारांना घेऊन मी ही लढाई लढलोय. पण, मुख्यमंत्री विदर्भाचा झाल्यानंतर औरंगाबादवर अन्याय झाला. औरंगाबाद महापालिकेसाठी राज्य सरकारचे केवळ 1100 ते 1200 कोटी रुपये मिळाले. तर, नागपूरसारख्या शहराला 12 हजार कोटी रुपये देण्यात आले. आता, हेही लोकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे, असेही चव्हाण यांनी म्हटले. तर, सर्वच पक्षातील राजकीय संबंधावर मिश्किल टीपण्णी केली.
मी शरद पवारसाहेबांना राजकीय आदर्श मानून काम करतो. माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या कुणालाही मी कधी पक्ष आणि जात विचारत नाही. शरद पवारांच्या मुशीतून मी तयार झालोय, त्यामुळे सर्वच पक्षात माझेही मैत्रिपूर्ण संबंध असल्याचे आमदार चव्हाण म्हणाले. तर, स्वत:च्या फटकळ स्वभावाबाबत बोलतानाही मी जे आहे ते कार्यकर्त्यांना तोंडावर स्पष्टपणे सांगतो. ज्याचं काम होणार नाही, त्यालाही तोंडावर नाही म्हणून सांगतो. कार्यकर्ते या फटकळ स्वभावामुळे सुरुवातीला दुखावतात, पण नंतर खरं काय ते त्यांच्या लक्षात येतं. गरज पडल्यास यापुढे मी जीभेवर साखर ठेवण्याचा प्रयत्न करेन. पण, मूळ स्वभाव जाणार नाही, असेही चव्हाण यांनी हसत हसत कबूल केले.