कोयता नगं सायेबं, मला शिकायचयं !
By Admin | Published: October 29, 2015 12:09 AM2015-10-29T00:09:19+5:302015-10-29T00:23:47+5:30
बीड : आई- वडिलांसोबत स्थलांतर केल्यानंतर अनेक पाल्यांचे भवितव्य अंध:कारमय होते;परंतु काही मुलांना शिक्षणाची ओढ असते.
बीड : आई- वडिलांसोबत स्थलांतर केल्यानंतर अनेक पाल्यांचे भवितव्य अंध:कारमय होते;परंतु काही मुलांना शिक्षणाची ओढ असते. असाच एक मुलगा आई- वडिलांसोबत कारखान्यावर निघाला होता;परंतु अधिकाऱ्यांनी विचारपूस केल्यावर त्याने ‘हो, मला शिकायचयं’ असे सांगितले. त्याला हंगामी वसतिगृहात ठेवायला आई- वडील तयार झाले अन् त्याच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.
राहुल भारत चव्हाण (रा. पाचेगाव ता. गेवराई) असे या मुलाचे नाव. झाले असे, सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड व समन्वयक महादेव चव्हाण हे बुधवारी अंबाजोगाई दौऱ्यावर होते. पालीनजीक त्यांना एका ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरमध्ये लहान मुलगा दिसला. या मुलाच्या चौकशीसाठी त्यांनी ट्रॅक्टर थांबवले. मुलाची चौकशी केल्यावर कळाले की, त्याचे आई- वडील त्याला सोबत घेऊन जात आहेत. यावेळी उपशिक्षणाधिकारी कराड यांनी राहुलला त्याच्या आजी- आजोबांकडे ठेवून वसतिगृहात नाव नोंदवून तेथील सुविधांचा लाभ घेण्याचे सूचविले. ‘साहेब, मला शाळा शिकायचीयं, ऊसतोडीला जायचे नाही’ असे सांगून राहुलने शिक्षणाची तळमळ दाखवली. त्यानंतर तो लगेचच ट्रॅक्टरमधून खाली उतरला. पाचेगाव येथील शाळेत सातवीत शिकणाऱ्या राहुलच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ऊसतोड मजुरांच्या पाल्यांच्या शिक्षणाची वाताहत नवी नाही;परंतु राहुलसारख्या कित्येक मुलांच्या भावना बोलक्या आहेत. (प्रतिनिधी)