भाऊ कुठे गेला माहिती नाही; शाळेतून घरी परतलेल्या लहान बहिणीच्या माहितीने कुटुंबीय हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 06:37 PM2022-03-21T18:37:59+5:302022-03-21T18:38:37+5:30
दोघेही दुपारी १ वाजेच्या सुमारास घरी येतात. मुलगी घरी आली, पण मुलगा आला नाही.
औरंगाबाद : धारेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय, नाथ प्रांगण शाळेत आठवीच्या वर्गात असलेला विद्यार्थी मंगेश सोमाजी पतंगे (१४, रा. नवनाथनगर, गारखेडा परिसर) हा १७ मार्च रोजी सकाळी ७ वाजता शाळेत जाण्यासाठी गेला तो परत आलाच नाही. या प्रकरणी मंगेशच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
शेवंता पतंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या पतीसह मजुरी करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. १७ मार्च रोजी सकाळी मुलगा मंगेश हा शाळेत जाण्यासाठी घरातून निघून गेला. त्यांची छोटी मुलगीही त्याच शाळेत शिक्षण घेते. दोघेही दुपारी १ वाजेच्या सुमारास घरी येतात. मुलगी घरी आली, पण मुलगा आला नाही. मुलीला विचारल्यानंतर तिनेही मंगेश शाळेतच आला नाही, असे सांगितले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्याचा मित्र, नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. त्यामुळे पुंडलिकनगर पोलिसात धाव घेतली.
अपहरण झाल्याची तक्रार मुलाच्या आईने नोंदवली आहे. मुलाचे वर्णन रंग गोरा, उंची ४ फूट, बांधा सडपातळ, डोळे काळे, केस काळे, भाषा मराठी व हिंदी बोलतो, समजते. अंगात काळ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स, पायात पिवळ्या रंगाची चप्पल, सोबत लाल रंगाची सॅक असून उजव्या हाताच्या पंजावर एम अक्षर गोंदवलेले आहे. याविषयी अधिक माहिती मिळाल्यास पुंडलिकनगर पोलिसांनी कळवावे, असे आवाहन उपनिरीक्षक एन.एस. शेख यांनी केले आहे.