लग्नासाठी हुंडा नको, चांगली मुलगी हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:02 AM2021-09-24T04:02:17+5:302021-09-24T04:02:17+5:30
बापू सोळुंके औरंगाबाद : देशात हुंडाबंदी असली तरी ही अनिष्ट प्रथा अजूनही समाजात कायम आहे. आजही हुंडा देऊन ...
बापू सोळुंके
औरंगाबाद : देशात हुंडाबंदी असली तरी ही अनिष्ट प्रथा अजूनही समाजात कायम आहे. आजही हुंडा देऊन घेऊन दरवर्षी सुमारे ९० टक्के विवाह पार पडतात. लग्नासाठी इच्छुक असलेले तरुण- तरुणींचा मात्र हुंड्याला विरोध असतो; परंतु मुलांच्या आई-वडिलांना हुंडा हवा असतो. हुंड्याशिवाय लग्न ही संकल्पना अजूनही अनेकजण स्वीकारायला तयार नाहीत.
नोकरी करणारी सुसंस्कृत मुलगी मिळणार असेल तर वराकडील मंडळी विनाहुंड्याचे लग्न करण्यासाठी तयार होतात. याउलट सरकारी नोकरी करणारा वर मिळण्यासाठी वधूकडील मंडळी मुलीचे कल्याण होईल, असे समजून हुंड्यासह इतर मागण्या पूर्ण करताना दिसून येतात. अनेक तरुण असेही आहेत की, त्यांना हुंडा नको, केवळ चांगली मुलगी हवी असते. दुसरीकडे, हुंडा मागणाऱ्या तरुणासोबत लग्न करणार नाही, अशाही मुली आहेत.
-----------
जिल्ह्यात हुंड्यासाठी छळाच्या किती आल्या तक्रारी
२०१८-२०५
२०१९-१९२
२०२०- २०२
२०२१ ऑगस्टपर्यंत- १२८
----------------------------------
चौकट
हुंडाविरोधी कायदा काय म्हणतो
लग्नानंतर विवाहितेकडे हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्यास भादंवि कलम ४९८ ‘अ’ नुसार पोलिसांत गुन्हा नोंदविला जातो. या गुन्ह्यांतर्गत आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना तीन वर्षे शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ नुसार हुंड्याची मागणी करणेही गुन्हा ठरविण्यात आला आहे.
-------------------------------------
प्रतिक्रिया
हुंडा देऊन लग्न कशासाठी करायचे?
हुंडा देणे-घेणे गुन्हा आहे. असे असले तरी आजकाल उच्चशिक्षित मुले आणि त्यांचे आई-वडील हुंडा घेतल्याशिवाय लग्न जुळवत नाही. एवढेच नव्हे तर उच्चशिक्षित मुलीही त्यास तयार होतात ही शोकांतिका आहे. लाखो रुपये हुंडा देऊन त्यांच्याकडे राहायला जायचे हे मला मान्य नाही. हुंडा मागणाऱ्या मुलांसोबत मी लग्न करणार नाही, अशी भूमिका घेत हुंडा मागणाऱ्या मुलांवर मुलींनी बहिष्कार टाकायला हवा.
- दीक्षा पवार (विद्यार्थिनी)
-----------------------------------------------------
मुलीला चांगले स्थळ मिळावे, हीच अपेक्षा
मला एकुलती एक मुलगी आहे. तिला चांगला नवरा मुलगा मिळावा. सासरही चांगले मिळावे, एवढीच माझी अपेक्षा. हुंडा, देणे-घेणे गुन्हा असला तरी याच पद्धतीने बरेच लग्न होतात. असे असले तरी हुंड्याशिवाय लग्न करणारी अनेक चांगले लोक समाजात आहेत. हुंडा न घेता मुलीसोबत लग्न करणाऱ्या होतकरू तरुणाचे स्थळ आले तर नक्की विचार करता येईल.
- मुलीचे वडील
----------------------------------------
हुंडा न घेण्यावर कायम
गेल्या काही वर्षांपासून हुंड्याची प्रथा बंद होत आहे. मी नुकताच नोकरीला लागलो. माझ्या लग्नासाठी स्थळ येण्यास सुरुवात झाली. मी हुंडा घेणार नाही. मला चांगली आणि उच्चशिक्षित मुलगी वधू म्हणून हवी असल्याचे मी स्पष्टपणे आई-वडिलांना सांगितले आहे.
- शुभम
--------------------------------
मला सुसंस्कृत सून हवी, हुंडा नाही
मला तीन मुले आहेत. मोठा मुलगा नुकताच नोकरीला लागला. त्याच्यासाठी स्थळ येण्यास सुरुवात झाली. त्याच्यासाठी सुसंस्कृत आणि नोकरी करणारी मुलगी आम्हाला हवी आहे. माझे मुलेदेखील हुंडा घेणार नाहीत, असे स्पष्ट सांगितले असल्यामुळे हुंडा देण्या-घेण्याचा प्रश्नच नाही.
- बबनराव पाटील.