'तुझ्यासोबत राहायचे नाही'; प्रियकरासोबत पळून गेलेल्या पत्नीनं सांगताच पतीचे टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:30 IST2025-01-29T18:29:41+5:302025-01-29T18:30:25+5:30

सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथील घटना; पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि अन्य दोघे अशा चौघांना घेतले ताब्यात

'I don't want to live with you'; Husband takes extreme step and ends life after wife elopes with lover | 'तुझ्यासोबत राहायचे नाही'; प्रियकरासोबत पळून गेलेल्या पत्नीनं सांगताच पतीचे टोकाचे पाऊल

'तुझ्यासोबत राहायचे नाही'; प्रियकरासोबत पळून गेलेल्या पत्नीनं सांगताच पतीचे टोकाचे पाऊल

सिल्लोड: आई, वडील, भाऊ- बहीण असे नातवाईक नसणाऱ्या तरुणाचा एकमेव सहारा होती पत्नी. ती देखील प्रियकरासोबत पळून गेल्याने नैराश्यात सापडलेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २८ जानेवारी रोजी सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथें  सकाळी ९ वाजता उघडकीस आली. चंद्रशेखर मनोहर सोनवणे ( वय ३४ वर्षे रा.रेलगाव ता.सिल्लोड) मृताचे नाव आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने या प्रकरणी पत्नी लक्ष्मीबाई चंद्रशेखर सोनवणे ( रा.रेलगाव ता.सिल्लोड), पत्नीचा प्रियकर मनोज रामसिंग मुंढे ( रा.अंभई ता.सिल्लोड) , प्रियकराची बहीण मनिषाबाई गणेश मेहेंदुले ( रा रेलगाव) व तिचा मित्र अंकुश लक्ष्मण भागवते ( रा. रेलगाव) या चौघांना पोलीसांनी बुधवारी सकाळी बेड्या ठोकल्या.

मयत चंद्रशेखर सोनवणे याचे व लक्ष्मीबाईचे लग्न ६ वर्षापूर्वी झाले होते. त्यांना एक मुलगा देखील आहे. दोघे मोल मजुरी करून उदर निर्वाह करत होते. मात्र शेतात काम करतांना लक्ष्मीबाईची ओळख मनोज रामसिंग मुंढे त्याची बहीण  मनिषाबाई गणेश मेहेंदुले आणि तिचा मित्र अंकुश लक्ष्मण भागवते यांच्यासोबत झाली. ओळख वाढत जाऊन लक्ष्मीबाई अन् मनोज मुंढे यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मनिषाबाई आणि तिचा मित्र अंकुश लक्ष्मण भागवते याने लक्ष्मीबाईस पती सोबत न राहता मनोजसोबत रहा, पती सोबत नांदू नको, असे म्हणत संसार तोंडण्यास प्रवृत्त केले. दरम्यान, २२ जानेवारी रोजी लक्ष्मीबाई आणि मनोज पळून गेले. 

इकडे पत्नी लक्ष्मीबाई  मिसिंग झाल्याची तक्रार पती चंद्रशेखर यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात २२ जानेवारी रोजी दिली. त्यानंतर लक्ष्मीबाई २७  जानेवारीला सापडली. यावेळी तिने मी पती सोबत राहत नाही. माझ्या मर्जीने मी प्रियकरासोबत जात आहे, असे पती व पोलिसांना सांगितले. यामुळे नैराश्यात सापडलेल्या पती चंद्रशेखर याने २७ जानेवारी रोजी मध्यरात्री स्वतः च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी मयताचे नातेवाईक योगेश पांडुरंग सुरडकर यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  त्यावरून पोलिसांनी लक्ष्मीबाई चंद्रशेखर सोनवणे ( रा.रेलगाव ता.सिल्लोड), पत्नीचा प्रियकर मनोज रामसिंग मुंढे ( रा.अंभई ता.सिल्लोड) , प्रियकराची बहीण मनिषाबाई गणेश मेहेंदुले ( रा रेलगाव) व तिचा मित्र अंकुश लक्ष्मण भागवते ( रा. रेलगाव) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एल.एस. घोडे, सचिन सोनार करत आहेत.

Web Title: 'I don't want to live with you'; Husband takes extreme step and ends life after wife elopes with lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.