मी अस्वस्थतेला शब्द देतो : बालाजी सुतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 01:08 PM2020-09-08T13:08:12+5:302020-09-08T13:10:41+5:30
बी. रघुनाथ पुरस्कार वितरण साधेपणाने
औरंगाबाद : मी अस्वस्थतेला शब्द देतो, असे उद्गार प्रसिद्ध कथाकार बालाजी सुतार यांनी सोमवारी येथे काढले. यंदाचा ‘बी. रघुनाथ पुरस्कार’ स्वीकारताना ते बोलत होते.
नाथ समूहाच्या कार्यालयात अत्यंत साधेपणाने हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. नाथ समूहाचे चेअरमन नंदकिशोर कागलीवाल यांच्या हस्ते रोख ११ हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सुतार यांचा सन्मान करण्यात आला. कोरोना आपत्तीमुळे यावर्षी नाथ संध्या हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. मागील २१ वर्षांपासून नाथ समूह आणि परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
बालाजी सुतार यांनी यावेळी सद्य:स्थितीवर भाष्य केले व लेखनामागची प्रेरणा सांगितली. ‘सरलेलं शतक आणि चालू शतक यांच्या सांध्यावरचा हा अस्वस्थ करणारा कालखंड. या काळाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न एक लेखक म्हणून मी करीत असतो,’ असे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. दासू वैद्य यांनी पुरस्कार निवडीमागची भूमिका स्पष्ट केली. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही पातळीवर बालाजी सुतार यांचे लेखन अवला आहे, असे ते म्हणाले. श्रीकांत उमरीकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. प्रा. अजित दळवी, अनुया दळवी, लक्ष्मीकांत धोंड, डॉ. आनंद निकाळजे, नीना निकाळजे व प्रा. मोहन फुले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी सतीश कागलीवाल, सुनील देशपांडे, राजेंद्र जोशी, संतोष जोशी, शिव फाळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
.............