औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी म्हणून अडीच वर्षांत खूप शिकायला मिळाले : उदय चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 02:13 PM2020-08-12T14:13:55+5:302020-08-12T14:25:16+5:30
प्रभारी जिल्हाधिकारीपदी अनंत गव्हाणे यांच्याकडे सूत्र
औरंगाबाद : जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना नियोजन समितीच्या सभागृहात एका छोटेखानी कार्यक्रमात मंगळवारी निरोप देण्यात आला. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्याकडे सोपविण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करीत निरोप समारंभ पार पडला. बुधवारी चौधरी हे मुंबईला मुख्य सचिव कार्यालयात उपसचिव पदाचा पदभार घेतील. दरम्यान या आठवड्याच्या अखेरीस जिल्हाधिकारी म्हणून कोण येणार, या चर्चेला शासनस्तरावरून विराम मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात उपसचिव पदी बदली#Aurangabad#collector#Transfers#MumbaiMantralayahttps://t.co/rmQsDWaP0I
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 10, 2020
निरोप समारंभाप्रसंगी केलेल्या सत्काराला उत्तर देताना चौधरी म्हणाले, जेव्हा अभ्यास करून यश मिळत नसे, त्यावेळी नाराज व्हायचो; पण आई मला सांगायची सगळ्यात एक चांगले कौशल्य असते. त्याचा उपयोग कर आणि आज त्यानुसार काम करीत आहे. आजवरच्या १० वर्षांच्या कारकीर्दीत औरंगाबादला खूप शिकलो. रुजू झाल्यावर कचरा प्रश्न, मराठा आरक्षण आंदोलन, लोकसभा, विधानसभा निवडणूक, दुष्काळ, अतिवृष्टी असे अनेक मुद्दे हाताळले. लोकप्रतिनिधी व सर्व सहकाऱ्यांमुळे काम करता आले.
प्रभारी जिल्हाधिकारी गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.