मी पाहिला, मृत्यू तरुणाचा आणि माणुसकीचाही !; हतबल होतो नाही वाचवू शकलो त्याला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 11:56 AM2017-11-15T11:56:55+5:302017-11-15T12:13:14+5:30
१२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मी पैठणला नाथसागर पाहायला गेलो होतो. एक अपरिचित व्यक्ती धरणात बुडत होती. मी आरडाओरड केली. माझे दाजी त्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. दोन तरुणांनी त्याला बाहेर काढले. अॅम्ब्युलन्सला कॉल करा म्हणून माझे दाजी आणि मी ओरडत होतो; पण कुणीच कॉल करीत नव्हते.
- ज्ञानेश्वर चौतमल
औरंगाबाद : १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मी पैठणला नाथसागर पाहायला गेलो होतो. एक अपरिचित व्यक्ती धरणात बुडत होती. मी आरडाओरड केली. माझे दाजी त्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. दोन तरुणांनी त्याला बाहेर काढले. अॅम्ब्युलन्सला कॉल करा म्हणून माझे दाजी आणि मी ओरडत होतो; पण कुणीच कॉल करीत नव्हते.
माझ्या मोबाइलची बॅटरी संपलेली होती. लोक फक्त आमच्याकडे बघत होते, तर कोणी फोटो काढत होते. कुणीच १०८ ला कॉल करीत नव्हते. मी पटकन पॉवर बँकला मोबाइल लावून कॉल केला. तेव्हा ११.५७ वाजले होते. मी त्याच्या हृदयावर हात ठेवून पाहिले; पण काहीच कळत नव्हते. कारण माझ्याच हृदयाचे ठोके जाम वाढलेले होते. आजूबाजूला माझ्यापेक्षाही वयाने मोठे असलेले ३-४ उच्च शिक्षित लोक उभे होते. ते फक्त पाहत होते. हात लावायला पण ते तयार नव्हते. कोण आहे? तुमचा कोण? कसे झाले? असे प्रश्न ते विचारत होते. मी म्हटलं अपरिचित आहे; पण माणूस आहे.
थोड्या वेळाने अॅम्ब्युलन्स आली; पण त्यात फक्त चालक होता, त्याने दुरूनच पाहिले आणि तो मेलाय, असे सांगितले. मी म्हटले डॉक्टर कुठे आहेत? हे विचारत असतानाच ०२०-२७१६५४०० नंबरहून माझ्या मोबाईलवर कॉल आला. त्यांनी विचारलं, अॅम्ब्युलन्स आली का? मी म्हटलं आली; पण सोबत डॉक्टर नाही. तेवढ्यात चालकाने माझा फोन त्याच्या कानाला लावला. डॉक्टर येत आहेत असे त्यानेच समोरच्या व्यक्तीला सांगितले. मी म्हटले, ‘नंतर बोला या माणसाला दवाखान्यात घेऊन चला अगोदर.’ पोलीस आल्यावर घेऊन जाऊ, असे तो म्हणाला. कॉल तुम्ही केला, तर तुम्हालाही पोलीस ठाण्यात यावे लागेल, असे त्याने सांगितले. मी म्हटले, ‘तो जिवंत असू शकतो. याला घेऊन अगोदर दवाखान्यात चला. नंतर पाहू कुठं जायचं?’
मी सोबत येत नाही हे पाहून बुडालेल्या व्यक्तीला तसाच सोडून तो रिकामी अॅम्ब्युलन्स घेऊन निघून गेला. त्याने खरेतर माणुसकी दाखवत त्या बुडालेल्या तरुणाला डॉक्टरपर्यंत घेऊन जायला हवे होते. तसे न करता तो थोड्या वेळाने डॉक्टरला घेऊन आला; पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. एवढ्या वेळेपर्यंत जायकवाडी धरणाचा एकही सुरक्षारक्षक घटनास्थळी पोहोचला नव्हता. तासाभराने पोलीस आले. पुढे त्यांचे त्यांचे काम त्यांनी केले.
तपास सुरूच
जायकवाडी धरणाच्या जलाशयात रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृतदेह आढळलेल्या या दुर्दैवी तरूणाचे नाव उमाकांत आश्रुबा चौधरी (रा. जेबा पिंप्री, ता.जि. बीड), असे आहे. तो बुडाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने त्याचदिवशी प्रसिद्ध केले. त्याने आत्महत्या केली की अपघात हे मात्र अद्याप समोर आले नसल्याचे पोलिसांनी मंगळवारी ‘लोकमत’ला सांगितले.
(या घटनेचा साक्षीदार असलेल्या पैठणमधील ज्ञानेश्वर चौतमल तरुणाने आपल्या भावना फेसबुकच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत.)