‘मला गरज आहे, १५ हजार पाठवा...’ माजी विभागीय आयुक्त भापकर यांचे फेसबुक अकाउंट हॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 12:53 PM2021-06-03T12:53:14+5:302021-06-03T12:54:27+5:30
अनेक व्यक्तींचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून काही फसवेवीर सायबर भामटे सहज कुणालाही गंडा घालत आहेत.
औरंगाबाद: ‘मला गरज आहे. १५ हजार रुपये पाठवा’ असा मेसेज औरंगाबादचे माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या फेसबुक अकाउंटच्या मेसेंजरवरून तुम्हाला आला तर आश्चर्य वाटू देऊ नका. त्यांच्या डॉ. भापकरांच्या मेसेंजरवरून या मागणीचे मेसेज अनेकांना गेले आहेत.
मोठ्या माणसांनाही पैशांची गरज असतेच की हो. जास्त द्वंद्वात न अडकता, चला देऊ या पाठवून पैसे, म्हणून तुम्ही द्याल पैसे पाठवून. पण सावधान बरं. अशा अनेक व्यक्तींचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून काही फसवेवीर सायबर भामटे सहज कुणालाही गंडा घालत आहेत.
माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, निवृत्त प्रा. गणी पटेल, नेत्र चिकित्सा अधिकारी संघटनेचे अध्यक्ष महेश वैष्णव यांच्यासह अनेकांचे फेसबुकवर बनावट अकाउंट उघडून सायबर भामट्यांनी त्यांच्या मित्रांना पैशाची मागणी केल्याचे समोर आले. हा प्रकार बुधवारी दुपारीसमोर आला.
सायबर गुन्हेगारांनी माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट उघडले. त्या अकाउंटवरून त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. ही फ्रेंड रिक्वेस्ट ज्यांनी स्वीकारली त्या सर्वांशी सायबर गुन्हेगाराने मेसेंजरद्वारे चॅटिंग केली आणि पैशाची मागणी केली. भापकर यांच्या एका मित्राला या भामट्याने १५ हजार रुपये मागितले. ही बाब समजताच डॉ. भापकर यांनी त्या तोतयाने मेसेंजरद्वारे त्यांच्या मित्राला १५ हजार रुपये मागितलेल्या संदेशाचा स्क्रीन शॉट फेसबुकवर अपलोड करून सर्वांना ही बाब सांगितली. तोतयाने बनावट अकाउंट उघडले असून, तो मेसेंजरच्या माध्यमातून पैशाची मागणी करीत आहे. कृपया कुणीही त्याच्याशी व्यवहार करू नका, अशी विनंती त्यांनी केली.
डॉ. गणी पटेल यांचेही फेसबुकवर बनावट अकाउंट उघडून त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील मित्रांना मेसेंजरच्या माध्यमातून पैशाची मागणी केल्याचे त्यांना समजले. त्यांच्या मित्रांनी त्यांना कॉल करून पैसे पाठवू का, असे विचारले तेव्हा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. याविषयी ते पोलिसांत तक्रार करणार आहेत. नेत्र चिकित्सा अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश वैष्णव यांचेही बनावट अकाउंट उघडून तोतयाने त्यांच्या अनेक मित्रांकडे पैशाची मागणी केली. हा प्रकार बुधवारी दुपारी समोर आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
फेसबुकवर वापरकर्त्याने प्रोफाइल सुरक्षित करावे
फेसबुक वापरकर्त्याने सर्वप्रथम त्यांचे अकाउंट सुरक्षित कसे राहील याची काळजी घ्यावी. फेसबुकने दिलेल्या सुरक्षा मानकानुसार तुम्ही तुमचे प्रोफाइल गार्ड वापरून सुरक्षित करू शकता. असे केल्यास कोणत्याही वापरकर्त्याची माहिती आणि छायाचित्र अनोळखी व्यक्ती वापरून तुमचे बनावट अकाउंट तयार करणार नाही. शिवाय अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.
- गीता बागवडे, पोलीस निरीक्षक. सायबर पोलीस, ठाणे