पैसे मीच हडपले!‘लेटर कॉन्सपिरेसी’ मित्राच्या सांगण्यावरून केली; हर्षकुमार पोलिसांसमोर नरमला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:14 IST2025-01-08T13:13:32+5:302025-01-08T13:14:56+5:30

हर्षकुमारने तयार केलेल्या बनावट लेटरहेड, ई-मेल आयडीसह संपूर्ण घोटाळ्याचा क्राइम सीन पुन्हा उभा राहणार; सायबर पोलिस, पंचासमक्ष जप्त मोबाइल, टॅबवरून घटनाक्रम समजून घेणार

I snatched the money! I did that 'letter conspiracy' on the advice of a friend; Harsh Kumar Kshirsagar relents before the police | पैसे मीच हडपले!‘लेटर कॉन्सपिरेसी’ मित्राच्या सांगण्यावरून केली; हर्षकुमार पोलिसांसमोर नरमला

पैसे मीच हडपले!‘लेटर कॉन्सपिरेसी’ मित्राच्या सांगण्यावरून केली; हर्षकुमार पोलिसांसमोर नरमला

छत्रपती संभाजीनगर : शासनाचे कोट्यवधी रुपये लंपास करून थेट पोलिस आयुक्तांना पत्र पाठवत संपूर्ण घोटाळा उपसंचालकांनीच केल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या हर्षकुमार क्षीरसागरने अखेर पोलिसांसमोर नमते घेतले आहे. आरोपी जीवन कार्यप्पा विंदडा याच्या मित्राच्या सांगण्यावरून मी तो पत्रप्रपंच केल्याची कबुली त्याने दिली. यात प्रामुख्याने टॅब, लॅपटॉप, मोबाइलचा वापर झाला आहे. त्यामुळे घोटाळ्याचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी आता सायबर पोलिस व पंचासमक्ष हर्षकुमारकडून क्राइम सीन समजून घेणार आहेत.

हर्षकुमारसह त्याची आई मनीषा, वडील अनिल व मामा हितेश आनंदा शार्दुल यांची पोलिस कोठडी संपल्याने मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अशोक अवचार यांनी शासनाच्या वतीने बाजू मांडताना आई, वडील, मामाच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तर, हर्षकुमारच्या चौकशी बाबत मुद्दे मांडून ७ दिवसांच्या पोलिस कोठडीची विनंती केली. न्यायालयाने सरकारी व आरोपी पक्षाची बाजू ऐकून हर्षकुमारला ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

लेटरहेड कसे तयार केले, घोटाळ्याचा क्राइम सीन उभारणार
-हर्षकुमारची आता नव्या मुद्द्यांवर चौकशी होणार आहे. नेट बँकिंगसाठी वापरलेले बनावट लेटरहेड कसे तयार केले ? कुठल्या टॅबचा वापर केला ?
- पत्रात नेट बँकिंगच्या परवानगीसाठी आवश्यक शासकीय भाषा, स्वरूप कोणी सांगितली ?
- जप्त केलेल्या कुठल्या टॅबवर व लेटरहेड कुठल्या ॲपचा वापर करून तयार केले, उपसंचालकांची सही, शिक्के लेटरहेडवर कसे घेतले, याचा सायबर पोलिस, पंचासमक्ष डेमो घेऊन पंचनामा केला जाईल.
- तीन ई-मेल आयडीसाठी जवळपास ६ पेक्षा अधिक आयपी ॲड्रेस वापर झाल्याचे बँकेने सांगितले. त्या सर्व टॅब, लॅपटॉप, संगणक, मोबाइलची पडताळणी होईल.

लेटर ‘कॉन्सपिरेसी’वर स्वतःचेच शिक्कामोर्तब
२५ डिसेंबर रोजी हर्षकुमारने पोलिस आयुक्तांना पत्र पाठवत घोटाळा क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांच्या सांगण्यावरून केला, त्यांना पैसे कुठे, केव्हा दिले, याबाबतही उल्लेख होता. पोलिस चौकशीत मात्र त्याने जीवन विंदडाच्या मित्राच्या सांगण्यावरून पत्र लिहिल्याची कबुली देत घोटाळा स्वतःच केल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.

नात्यातल्या मुलीलाही हेरण्याचा प्रयत्न, तरुणीकडून टॅब, मोबाईल जप्त
कोट्यवधी रुपये आल्यानंतर हर्षकुमार व त्याच्या कुटुंबाचे राहणीमान अचानक बदलले. वडिलांनी व्यवसायाचे काम कमी केले, आईने सुरक्षारक्षकाची नोकरी सोडली. अर्पिताव्यतिरिक्त हर्षकुमारने नात्यातील एका मुलीसोबत जवळीक साधली होती. हर्षकुमारने तिला महागडे टॅब, दोन मोबाईल भेट दिले. त्याच्याकडे अचानक आलेल्या श्रीमंती (आलिशान घर, वाहने व उच्चभ्रू राहणीमाना)मुळे मुलीच्या कुटुंबाला देखील त्यांचा हेवा वाटायला लागला होता. मात्र, त्यांची मैत्रीची बोलणी पुढच्या टप्प्यावर जाण्यापूर्वीच त्याचा कारनामा उघड झाला व मोठ्या घोटाळ्यात अडकण्यापासून तरुणी वाचली. पोलिसांनी हर्षकुमारने भेट दिलेल्या महागड्या तिन्ही वस्तू जप्त करून तिचा जबाब नोंदविला आहे.

Web Title: I snatched the money! I did that 'letter conspiracy' on the advice of a friend; Harsh Kumar Kshirsagar relents before the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.