मला लस घ्यायचीय, पण होणाऱ्या बाळाच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:02 AM2021-07-21T04:02:02+5:302021-07-21T04:02:02+5:30
काळजीने पती अन् सासू परवानगीच देईना वंशाच्या दिव्याची मानसिकता येतेय आड : शहरात आतापर्यंत फक्त ४ गरोदर माता, ११ ...
काळजीने पती अन् सासू परवानगीच देईना
वंशाच्या दिव्याची मानसिकता येतेय आड : शहरात आतापर्यंत फक्त ४ गरोदर माता, ११ स्तनदा मातांनी घेतला डोस
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : ‘केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गरोदर माता, स्तनदा मातांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यास मान्यता दिली असून, शहरात या लसीकरणाला सुरुवातही झाली आहे. परंतु लसीकरणाकडे गरोदर माता, स्तनदा मातांनी पाठ फिरवली आहे. अनेक गर्भवतींना लस घ्यायची आहे. परंतु होणाऱ्या बाळाच्या काळजीने पती, सासू परवानगीच देत नसल्याची चिंताजनक स्थिती आहे.
१६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत गेल्या सहा महिन्यांत विविध टप्प्यात लसीकरण करण्यात आले. परंतु गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या लसीकरणाची प्रतीक्षा होती. कोरोना लसीकरणाविषयीच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने शिफारस केल्यानुसार गरोदर मातांच्या लसीकरणाला मंजुरी मिळाली आहे. कोविन पोर्टलवर नोंदणी करून अथवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन गरोदर मातांना लस घेता येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे. त्यास नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. परंतु गर्भवती, स्तनदा मातांचे दुर्लक्ष होत आहे. कुटुंबीयांची परवानगी मिळत नसल्याने अनेकांना इच्छा असूनही लस घेता येत नसल्याची स्थिती आहे. शहरात आतापर्यंत फक्त ४ गरोदर माता आणि ११ स्तनदा मातांनी लसीचा डोस घेतला आहे.
----
न घाबरता लस घ्या
गरोदर माता, स्तनदा मातांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासंदर्भात गाईडलाइन प्राप्त झाल्या आहेत. गरोदर माता, स्तनदा मातांचे समुपदेश केले जाते. त्यांनी होकार दिल्यानंतरच लस दिली जाते. लस देण्यासंदर्भात कुटुंबीयांनाही माहिती दिली जाते. शासनाने सर्व चाचण्या घेऊन लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे न घाबरता गरोदर माता, स्तनदा मातांनी लस घ्यावी. लेखी संमतीची गरज नाही.
- डाॅ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
------
दोन जीवांची भीती
घरातील सर्वांनी लस घेतली आहे. मलाही कोरोना लस घेण्याची इच्छा आहे. परंतु घरचे तयार होत नाहीत. लस घेतल्यानंतर अनेकांना ताप येतो, त्रास होतो, असा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे उगीच आता कशाला, नंतर बघू असे ते म्हणत आहेत. त्यामुळे लस घेता येत नाही.
- गर्भवती महिला
------
प्रसूतीनंतर मला लस घेता येईल, असेच अनेक जण सांगत आहेत. मलाही थोडी भीती वाटत आहे. त्यामुळे अजूनपर्यंत लसीकरण केंद्रात गेले नाही. नियमित तपासणीसाठी ज्या डाॅक्टरांकडे जाते, त्यांना मी लस घेऊ का नको, हे विचारणार आहे.
- गर्भवती महिला
-------
जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती
भाग-------पहिला डोस-------दुसरा डोस
शहर-------३,८४,७६६-------१,४२,१८१
ग्रामीण------३,८७,२७८------१,११,७२५
-------
शहरातील स्थिती
- गरोदर मातांचे लसीकरण- ४
- स्तनदा मातांचे लसीकरण- ११
------
ग्रामीण भागांत सुरुवातच नाही
ग्रामीण भागांत गरोदर माता, स्तनदा मातांच्या लसीकरणाला अद्याप सुरुवातच झालेली नाही. लेखी संमतीपत्राचा नमुना येणे बाकी आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.