झोपेत होतो, काय घडले कळलेच नाही, रुग्णालयात आल्यानंतरच डोळे उघडले
By संतोष हिरेमठ | Published: October 15, 2023 11:17 AM2023-10-15T11:17:23+5:302023-10-15T11:17:46+5:30
सैलानी बाबाचे दर्शन करून परतीचा प्रवास करीत होतो. गाडीत सर्वजण झोपेत होतो.
संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर : सैलानी बाबाचे दर्शन करून परतीचा प्रवास करीत होतो. गाडीत
सर्वजण झोपेत होतो. अचानक काय घडले कळलेच नाही आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा रुग्णालयात होतो, अशा शब्दात समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात जखमी झालेले अनिल साबळे यांनी आपली भावना व्यक्त केली.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा वैजापूर येथे दोन वाहनांच्या धडकेत 12 जण ठार तर 18 जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विविध वार्डात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बहुतांश जखमी हे नाशिक येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर जांबरगाव टोलनाक्यासमोर पहाटे दीड वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे 12 जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत हे नाशिक शहरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
ती गाडी आरटीओ कार्यालयाची नाही
आरटीओ कार्यालयाने ट्रक रोखल्याची चर्चा सुरू आहे. मात्र हे आरटीओ कार्यालयाचे वाहन नव्हते. तर महामार्गावर गस्त घालणाऱ्या इतर यंत्रणेचे वाहन होते, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.