'माझी चूक झाली, पुन्हा असं होणार नाही'; यूट्यूबर काव्याने सांगितलं घर सोडण्यामागचं नेमकं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 01:55 PM2022-09-11T13:55:11+5:302022-09-11T13:55:20+5:30
१६ वर्षांची बिनधास्त काव्या प्रसिद्ध युथट्युबर आहे. आईवडील अभ्यासावरून रागावल्याने शुक्रवारी दुपारपासून काव्या घरातून बाहेर पडली.
औरंगाबाद : शहरातील प्रसिद्ध यू-ट्युबर ‘बिनधास्त काव्या’ ही अल्पवयीन युवती शुक्रवारी दुपारी दोन वाजेपासून बेपत्ता झाली होती. रागाच्या भरात निघून गेलेल्या काव्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) मदतीने काही तासांत शोधण्यात शहर पोलिसांना यश आले. खुशीनगर एक्स्प्रेसमधून तिला ताब्यात घेत मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले. त्यानंतर तिला औरंगाबाद शहरात आणले.
१६ वर्षांची बिनधास्त काव्या प्रसिद्ध युथट्युबर आहे. आईवडील अभ्यासावरून रागावल्याने शुक्रवारी दुपारपासून काव्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतली नाही. तिचा मोबाईल देखील घरीच होता. यासंबंधी छावणी पोलिसांत मिसिंगची तक्रार आई वडिलांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता सरांनी माहिती घेऊन तात्काळ भोपाळ पोलिसांशी संपर्क साधला. अखेर काही तासांत तिला शोधण्यात यश आले. इटारसी रेल्वे स्टेशनवर काव्या आढळून आली.
काव्याचा पोलिसांनी जबाब नोंदवला असून तिने यामध्ये घर सोडण्याचं कारण सांगितलं आहे. माझ्यावर बाबा खूप रागावले. मला राग सहन झाला नाही. तसेच यावेळी आई-वडिलांचंही भांडण झालं. भांडणामुळे शुक्रवारी मी घरातून निघून गेले. बाबांच्या रागावण्याने मी घर सोडायला नको होतं, माझी चूक झाली. आता अशी चूक माझ्याकडून पुन्हा होणार नाही, असं बिनधास्त काव्याने सांगितलं.
आई वडिलांनी केले होते आवाहन-
'आमची मदत करा. काव्याला सर्व जण ओळखतात. तिचा मोबाईल पण आमच्या जवळ आहे. तिच्याकडे केवळ दोनच हजार रुपये आहे. शुक्रवारी दुपारीपासून काव्या घरी परतली नाही. तिच्याबद्दल माहिती मिळाली तर आम्हाला छावणी पोलिसांना कळवा.', अशी आर्जव करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध युट्युबर बिनधास्त काव्याच्या आईवडिलांनी शेअर केला होता. ते दोघेही दिवसरात्र तिला शोधत होते.
यू-ट्युबवर ५ मिलिअन फॉलोअर्स-
यू-ट्युबर ‘बिनधास्त काव्या’ तिच्या नटखट स्वभावामुळे सोशल मीडियावर परिचित आहे. लहान मुले, तरुण आणि आबालवृद्धांमध्येही तिचे रिल्स चांगलेच लोकप्रिय आहेत. तिचे यू-ट्युबवर साडेचार मिलियनपेक्षा जास्त, तर इन्स्टाग्रामवर १ मिलिअन फॉलोअर्स आहेत. याच चॅनलवरून तिच्या पालकांनी मुलीला शोधण्यासाठी मदतीचे आवाहन करत चार तासांचा व्हिडिओ केला. ती यूट्युबवर, खेड्यातील एक दिवस, चुलीवरचं जेवण, कॉलेजमधला पहिला दिवस किंवा पर्यटक म्हणून विविध शहरांमध्ये फिरताना, असे निरनिराळे व्हिडीओ अपलोड करत असते.