'अर्धा तासात येतो' वडिलांना फोनवर बोलून वळण घेताच अंमलदारास टेम्पो ट्रॅव्हल्सने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 07:55 PM2024-02-12T19:55:57+5:302024-02-12T19:58:07+5:30
छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी आठवड्यात दोन सहकारी गमावले
छत्रपती संभाजीनगर : मित्राला भेटून शहरात परतत असताना अंमलदार अविनाश नारायण जोशी (४४, रा. आविष्कार कॉलनी, एन-६) यांचा टेम्पो ट्रॅव्हल्सच्या धडकेत मृत्यू झाला. कचनेर फाट्याजवळ पेट्रोल भरण्यासाठी वळण घेताना सुसाट ट्रॅव्हल्स चालकाने त्यांना धडक दिली. रविवारी पहाटे ३.३० वाजता हा अपघात घडला. जोशी यांच्या जाण्याने रविवारी संपूर्ण पाेलिस दल हळहळले.
जोशी शनिवारी सायंकाळी मित्राला भेटण्यास गेले. कचनेर परिसरात मित्राला भेटून मध्यरात्री दुचाकीवरून एकटे शहराकडे परतत होते. कचनेर फाट्याजवळ पेट्रोल भरण्यासाठी त्यांनी उजव्या बाजूला वळण घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, टेम्पो ट्रॅव्हल्स (एपी २९ -यु - ५३०७) बीडच्या दिशेने सुसाट जात होता. पंपापासून काही अंतरावर वळण घेतानाच ते ट्रॅव्हल्सखाली सापडले. वेग खूप असल्याने जोशी लांब फेकले जाऊन ट्रॅव्हल्सचा समोरील संपूर्ण भाग चेपला गेला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन अन्ननलिकाच तुटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. करमाड पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. उपनिरीक्षक डी. डी. बनसोडे अधिक तपास करत आहेत.
मुलीचा वाढदिवस साजरा करून गेले
शनिवारी जोशी यांची साप्ताहिक सुटी असल्याने त्यांनी दिवसभर कुटुंबासोबत वेळ घालवला. आई, वडील, पत्नी, १५ वर्षांचा मुलगा, १३ वर्षांची मुलगी व एक लहान भाऊ असे त्यांचे कुटुंब आहे. शनिवारी त्यांनी लाडक्या मुलीचा वाढदिवस आनंदात साजरा केला. तिथीप्रमाणेदेखील पुन्हा वाढदिवस साजरा करू, असे वचन त्यांनी मुलीला दिले. उशीर झाल्याने २.३० वाजता त्यांच्या वडिलांनी त्यांना फोन केला. तेव्हा अर्ध्या तासात घरी पोहोचतो, असे जोशी वडिलांना म्हणाले. मात्र, काही वेळातच ही घटना घडली. मुलीला दिलेले वचनदेखील कायमसाठी अधुरे राहिले. एन-६ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
वडील सेवानिवृत्त लष्करी जवान, मुलगा पोलिस
धार्मिक कुटुंबातील असलेल्या जोशी यांचे वडील सेवानिवृत्त लष्करी जवान असून त्यांनीदेखील जिल्हा पोलिस दलात सेवा केली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जोशी यांनी १५ वर्षे राज्य राखीव पोलिस दलात (एसआरपीएफ) कर्तव्य बजावले. त्यानंतर शहर पोलिस दलात रुजू झाले. ५ वर्षे त्यांनी पोलिस आयुक्तांच्या दालनात सहायक म्हणून काम केले. त्यानंतर बीडीडीएसमध्ये त्यांची बदली झाली होती. महिनाभरापूर्वीच त्यांनी बॉम्ब नाशकाचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. पोलिस प्रशिक्षण केंद्रातून ड्रिल इंस्ट्रक्टर (कवायत प्रशिक्षक)चा कोर्सदेखील केला होता.