आता माझ्या पाठींब्यावर चंद्रकांत खैरे खासदार होणार; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 03:51 PM2023-02-04T15:51:23+5:302023-02-04T15:58:44+5:30
मागील लोकसभेत हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे पराभव झाल्याचा चंद्रकांत खैरे यांचा आरोप
औरंगाबाद: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ प्रदर्शित करत, आपण आता लोकसभा नाही तर कन्नड मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत, असे स्पष्ट केले. तसेच खासदार इम्तियाज जलील यांनी आपण पुन्हा एकदा निवडून येणार असल्याचे वक्तव्य केल्याचं उल्लेख करत, यावेळी चंद्रकांत खैरे खासदार होणार कारण मी त्यांच्यासोबत असेल असा दावा केला आहे. विशेष म्हणजे, मागील लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेल्या मतांमुळे आपला पराभव झाल्याची भावना खैरे यांची आहे. यामुळे मागील निवडणुकीतील कट्टर विरोधक आता खरेच एकत्र येणार का ? अशी चर्चा रंगली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. एमआयएम- वंचितचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा विजय झाला. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विरोध करत मोठ्या प्रमाणावर मते घेतल्याने आपला पराभव झाल्याचा आरोप माजी खासदार खैरे यांनी केला होता. मात्र, आता जाधव यांनी खैरे यांना माझा पाठिंबा असेल अशी घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरु आहेत. माजी खासदार खैरे हे उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत. तर कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत हे देखील ठाकरे गटात आहेत, यामुळे जाधव त्यांच्या पाठिंब्यावर किती काळ ठाम राहतील याबाबत विविध अंदाज वर्तवले जात आहेत.
व्हिडिओतून हर्षवर्धन जाधव म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत माझं लक्षच नव्हतं. घरगुती वादात मी एवढा अडकलो होतो. निवडणुकीला वेळ देऊ शकलो नव्हतो. या गृहकलहात मी इतका अडकलो की रायभन जाधव साहेबांनी दिलेली जबाबदारीच मी विसरून गेलो. माझ्या एका मित्राचा महावितरणाच्या चुकीमुळे जीव गेला आणि त्याचे मुलं उघड्यावर आली. त्यामुळे मी गृहकलह-गृहकलह करत बसल्यास आशा घटना घडत राहतील. म्हणून आता आगामी विधानसभा निवडणुकीत मी पुन्हा मैदानात उतरणार आहेत. तर इम्तियाज जलील म्हणतात, ते पुन्हा खासदार होतील. मात्र यावेळी चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा औरंगाबादचे खासदार होणार असल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. आपण विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे देखील जाधव म्हणाले.