झुुलेगा पालना...महावीर आयेंगे अंगना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:50 AM2018-03-28T00:50:45+5:302018-03-28T00:51:41+5:30
‘झुलेगा सोने-चांदी का पालना... वीर महावीर अब आयेंगे अंगना,’ म्हारो आंगन आये आज देखो मंगल घड़ी’, अशा गीत व नृत्यात सारे हरखून गेले होते. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात गायकांनी उपस्थितांवर भक्तिसुरांचा वर्षाव करीत मंगळवारची सायंकाळ अविस्मणीय केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘झुलेगा सोने-चांदी का पालना... वीर महावीर अब आयेंगे अंगना,’ म्हारो आंगन आये आज देखो मंगल घड़ी’, अशा गीत व नृत्यात सारे हरखून गेले होते. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात गायकांनी उपस्थितांवर भक्तिसुरांचा वर्षाव करीत मंगळवारची सायंकाळ अविस्मणीय केली.
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त राजाबाजार येथील हिराचंद कासलीवाल प्रांगण भाविकांनी भरून गेले होते. महिलांची संख्या वाखाणण्याजोगी होती. भव्य रंगमंचावर एलईडी स्क्रीन बसविण्यात आलेहोते. या स्क्रीनवर सकल जैन समाजाद्वारे एकत्रितपणे काढण्यात येणाऱ्या महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या शोभायात्रेचे छायाचित्र दाखविण्यात येत होते. ते पाहून सर्वजण जुन्या आठवणींत रमले होते. स्वाती साहुजी यांनी ‘महामंत्र नवकार’ म्हणत सुरेल भक्तिसंध्येला सुरुवात केली. ‘स्वर्ग से सुंदर स्वप्नों से प्यारा है तेरा दरबार, जहाँ तेरा प्यार मिला है मुझे’ हे गीत सुरेख आवाजात गाऊन आशिष बोथरा यांनी सर्वांच्या हृदयात स्थान मिळविले. यानंतर ‘हम करते है सब को नमन’ या गीतावर तरुणींनी उत्तम नृत्य करीत सर्वांची दाद मिळविली. यानंतर जैन संगीतकार संजय संचेती व समूहाने ‘जहाँ डाल-डाल पर सोने की... ये भारत देश हमारा’ हे देशभक्तीपर गीत सादर करून सर्वांचे मन प्रफुल्लित केले. यानंतर शैलेश पहाडे यांनी ‘हर जनम मे प्रभू तेरा साथ चाहीयें’ हे गीत, तर वैशाली पहाडे यांनी ‘ओ महावीरा, ओ महावीरा’ गीत सादर केले. ‘भक्ती की है रात प्रभूवर आज थाने आनो है’ यासह अन्य पाळणा गीतांनी सर्वांना आत्मानंद मिळवून दिला. याशिवाय सोनल संचेती, कल्पना मेहता यांनीही भक्तिगीत सादर करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी, सकल जैन समाजांतर्गत महोत्सव समितीच्या सर्व पदाधिका-यांनी दीप प्रज्वलन करून भक्तिसंध्येला सुरुवात केली.
महिला मंडळांनी आणली रंगत
भक्तिसंध्या कार्यक्रमात गीत व नृत्य सादर करून महिला मंडळांनी रंगत आणली. यात चंद्रप्रभू बहु मंडळ, संस्कार महिला मंडळ, पार्श्वनाथ महिला मंडळ, त्रिशला महिला मंडळ, हडको कन्या मंडळ, अरिहंत महिला मंडळ यांचा समावेश होता.