आईची मी काळजी घेईन; पण बाबा कुठेत? समृद्धीवर अपघात, चिमुकलीच्या प्रश्नाने सारे निरुत्तर
By संतोष हिरेमठ | Published: July 4, 2023 01:35 PM2023-07-04T13:35:21+5:302023-07-04T13:45:30+5:30
समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; चिमुकलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवल
छत्रपती संभाजीनगर : परिचारिका, ब्रदर जिथे बसतात, त्या टेबलजवळ ७ वर्षांची चिमुकली बसलेली होती. परिचारिका, ब्रदर तिची आपुलकीने विचारपूस करीत होते, काळजी घेत होते. नातेवाईक पोहोचले, तरी ती त्यांच्याजवळ बसून होती. जखमी अवस्थेतील आईची ‘मी घरी काळजी घेईन’ अशी सांगत होती. आपले ‘बाबा’ कायमचे सोडून गेले, याची तिला कल्पनाच नव्हती. ‘बाबा कुठे आहेत’, असे ती विचारत होती. समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात ती बालंबाल बचावली. तिला साधे खरचटलेही नाही; पण तिच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले.
समृद्धी महामार्गावर सोमवारी पहाटे झालेल्या अपघातात सुशीलकुमार थोरात यांचा मृत्यू झाला, तर पत्नी बबिता थोरात या गंभीर जखमी झाल्या, तर ७ वर्षांची मुलगी अद्विता ही बचावली. १०८ रुग्णवाहिकेतून बबिता यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोबत अद्विता होती. बबिता यांच्या चेहऱ्यावर मार लागला. एक हात फ्रॅक्चर झाला. आईवर उपचार सुरू असताना अद्विता ही अपघात विभागातील ब्रदर, परिचारिकांच्या टेबलजवळ बसून होती. ब्रदर आणि परिचारिकांचा अपघात झाल्याची माहिती घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्रदर, परिचारिकांना मिळाली. नातेवाईक येईपर्यंत काही ब्रदर, परिचारिका मदतीसाठी धावून आल्या. अद्विकाची सारे आस्थेवाईकपणे काळजी घेत होते. शहरातील नातेवाइकांनीही घाटीत धाव घेतली. घाटीतील उपचारानंतर बबिता यांना पुढील उपचारासाठी वाशिम येथे नेल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
खूप भयानक अपघात...
बबिता यांना बोलणेही कठीण जात होते. तशाही अवस्थेत नातेवाइकांशी बोलताना ‘खूप भयानक अपघात’ असे त्या म्हणाल्या. उपचार सुरू असताना सुशीलकुमार यांच्या मृत्यूची त्यांना कल्पना दिलेली नव्हती; पण त्या पतीविषयी वारंवार विचारत होत्या.
गाडी खूप उंचावरून खाली पडली
अद्विका चारचाकीच्या पाठीमागे बसलेली होती. गाडी खूप उंचावरून खाली पडली, असे तिने परिचारिकांशी बोलताना सांगितले. बाबा कुठेत, अशी ती विचारणा करीत होती.