कृतार्थ मी... मी निष्ठेने काम केले व समाजाने मला खूप-खूप प्रेम दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 12:05 PM2020-03-09T12:05:02+5:302020-03-09T12:06:35+5:30

मराठी सारस्वतातील एक रत्न पद्मश्री डॉ. युसूफखान महंमदखान पठाण ऊर्फ यु.म. पठाण हे सोमवारी (दि.९) वयाची ९० वर्षे पूर्ण करीत आहेत.

I worked with integrity and society gave me a lot of love : Y.M.Pathan | कृतार्थ मी... मी निष्ठेने काम केले व समाजाने मला खूप-खूप प्रेम दिले

कृतार्थ मी... मी निष्ठेने काम केले व समाजाने मला खूप-खूप प्रेम दिले

googlenewsNext
ठळक मुद्दे मी जे काही केले त्याला मराठी जनतेने खूप चांगला प्रतिसाद दिला.कुठेही मला उपरेपणाचा, जातीवादाचा सामना करावा लागला नाही.

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद : मराठीतील एक लेखक असले तरी हिंदी, इंग्रजी व फारशी वाङ्मयातील त्यांची मुक्त मुशाफिरी ही वादातीत. संत साहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार, लघुकथा लेखक, ललित लेख, व्यक्तिचित्रे आदी वाङ्मय प्रकारात दादा माणूस. तब्बल ७० हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या प्रकाशित पुस्तकांच्या संख्येएवढ्याच किंवा त्याहून अधिक पुरस्कारांनी त्यांना महाराष्ट्रासह, देश व विदेशातील विविध संस्था, सरकारांनी गौरविले आहे. फारशी भाषेला मराठीत आणणारे, महाराष्ट्रातील विविध धर्मसंप्रदायांचे चिकित्सक अभ्यासक, अवघा महाराष्ट्र पायाखाली घालून पाच हजारांहून अधिक प्राचीन हस्तलिखित पोथ्या जमा करणारे संग्राहक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मराठी विभाग जागतिक स्तरावर नेणारे ज्ञानमहर्षी, हजारो विद्यार्थी घडविणारे गुरू, मराठी सारस्वतातील एक रत्न पद्मश्री डॉ. युसूफखान महंमदखान पठाण ऊर्फ यु.म. पठाण हे सोमवारी (दि.९) वयाची ९० वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’ने त्यांच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद. 

आई-वडील हेच माझी प्रेरणा
माझे वडील बी.ए. होते. आई त्या काळात मॅट्रिकपर्यंत शिकलेली होती. आई करमाळ्याची होती. ती ग्रामीण मराठी खूूप चांगले बोलायची. मराठीवर त्यांचे प्रेम होते. मुळात आमचे सर्व घरच मराठी होते. त्यामुळे मी बालपणापासूनच मराठीकडे आकर्षित झालो. माझी मराठी चांगली असण्याचे कारण हे कुटुंबाकडून मला मिळालेले बाळकडू होय. माझे सर्व कुटुंबच सुशिक्षित होते. माझे आजोबा (आईचे वडील) डॉक्टर होते. 

गणित हा माझा कच्चा विषय
मी शाळेला दांडी कधीच मारली नाही. मी खेळ फारसे खेळलोे नाही; परंतु सतत अभ्यास, लेखन व वाचन करायचो; पण गणित हा माझा सर्वात कच्चा विषय. त्या विषयात मला फार कमी मार्क मिळायचे. त्यामुळे वाईट वाटायचे. मग सुधारणा केली व गुण चांगले पडू लागले. १९४७ मध्ये मुंबई बोर्डामधून मी मॅट्रिक पास झालो. मॅट्रिकपूर्वीच मी लिहू लागलो होतो व ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’सारख्या प्रतिष्ठित मासिकांतून माझे लेखन प्रसिद्धही झाले होते.

माझ्या शिक्षकाचा मला अभिमान मला माझ्या शिक्षकांचा 
कायमच अभिमान वाटत आला आहे. साताऱ्याला असताना मला मो. रा. वाळिंबे हे शिक्षक होते. सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये असलेले माझे प्रिन्सिपल श्रीराम शर्मा हे इतिहासाचे मोठे अभ्यासक होते. तेथेच वि.म. कुलकर्णी यांच्यासोबत मी काम केले. माझ्या जडणघडणीत माझ्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे.

मराठी समाजामुळे मी घडलो
मी जे काही केले त्याला मराठी जनतेने खूप चांगला प्रतिसाद दिला. कुठेही मला उपरेपणाचा, जातीवादाचा सामना करावा लागला नाही. हे बाहेरचे, दुसऱ्या धर्माचे आहोत, असे मला कधीच जाणवले नाही किंवा कुणीही मला तसे वागवले नाही. मी संत साहित्याचा अभ्यास करतोय म्हणून कुणी मुस्लिम धर्मीयांनीही मला विरोध केला नाही. या सर्व धर्मीयांचेच माझ्यावर उपकार आहेत, असे मी मानतो. 
 

Web Title: I worked with integrity and society gave me a lot of love : Y.M.Pathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.