परिवर्तनाचा विचार गुड सेन्स न राहता कॉमन सेन्स बनवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:05 AM2021-03-28T04:05:17+5:302021-03-28T04:05:17+5:30
औरंगाबाद : परिवर्तनाचा विचार गुड सेन्स न राहता कॉमन सेन्स बनावा. परिवर्तनवादी विचार समाजात रुजले पाहिजेत. पोषण झाले ...
औरंगाबाद : परिवर्तनाचा विचार गुड सेन्स न राहता कॉमन सेन्स बनावा. परिवर्तनवादी विचार समाजात रुजले पाहिजेत. पोषण झाले पाहिजे आणि ते समाज व्यवहारही झाले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत मिलिंद आवाड यांनी देवगिरी महाविद्यालयाच्या फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत केले.
या ऑनलाइन व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी पंडितराव हर्षे होते. ‘परिवर्तनवादी विचार व समाज व्यवहार’ असा आवाड यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी व्याख्यानमालेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार यांनी प्रास्ताविक करून आवाड यांचा परिचय करून दिला.
आवाड यांनी सांगितले की, भारतीय समाजात जातिव्यवस्था रुजलेली आहे आणि ती समाप्त करण्याचा प्रयत्न महामानवांनी केला. शाहू महाराजांनी आडनावे बदलून जातीय कलंकितपणा दूर करण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्यांना नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून सन्मानित केले. परिवर्तनवादी धोरण अवलंबून मानखंडना दूर केली आणि समाजाचा व्यवहार बदलण्यास भाग पाडले. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः वेदना भोगल्या. सर्वच महामानवांनी मानवी व्यवहार आणि मानवतावादी दृष्टी आपल्या आयुष्यात जोपासली. यंदाच्या व्याख्यानमालेचे तिसावे वर्ष होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही व्याख्यानमला ऑनलाइन झाली. आवाड यांनी शनिवारी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफले.