दिव्यांग मुलीशी विवाह करून निर्माण केला आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:37 AM2017-07-25T00:37:24+5:302017-07-25T00:42:40+5:30
बीड : लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या असतात असा समज असला तरी आजच्या विज्ञानयुगातील हायटेक जमान्यातही काही जण आपापल्या परिने आदर्श घडवित असतात
सतीश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या असतात असा समज असला तरी आजच्या विज्ञानयुगातील हायटेक जमान्यातही काही जण आपापल्या परिने आदर्श घडवित असतात. अशाच एका तरुणाने दिव्यांग मुलीशी लग्न करून सामाजिक भावना जोपासली.
पांढऱ्याची वाडी येथील अमोल उर्फ कैलास विक्रम शेळके (वय २६) आणि साखरे बोरगाव (ता.बीड) येथील मीरा दगडू जगदाळे (वय ३५) यांचा २४ जुलै १७ रोजी दुपारी एक वाजता येथील विवाह नोंदणी कार्यालयात विवाह केला. त्यानंतर हे दोघे वानगाव येथील रामहरीबाबा सुंस्कार आश्रमात दुपारी तीन वाजता धार्मिक विधीप्रमाणे नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थांच्या साक्षीने विवाहबद्ध झाले. धाडसी निर्णय घेऊन आदर्श निर्माण करणारा अमोल आणि दिव्यांगावर मात करीत एमएपर्यंत शिक्षण घेऊन प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या मीराला उपस्थितांनी भरभरून आशिर्वादाच दिले नाही तर त्यांचे तोंड भरून कौतुकही केले.