डायलिसिस, रक्तपेढी, मोबाइल अॅम्ब्युलन्स सेवा देण्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:21 AM2017-11-03T01:21:35+5:302017-11-03T01:21:39+5:30
महापौर नंदकुमार घोडेले यांनी मनपाच्या आरोग्य विभाग अधिका-यांची बैठक घेऊन डायलिसिस, रक्तपेढी, मोबाइल अॅम्ब्युलन्स, कार्डियाक अॅम्ब्युलन्स, डेन्टल हॉस्पिटल सुरू करण्याबाबत चर्चा केली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मनपाच्या आरोग्य विभाग अधिका-यांची बैठक घेऊन डायलिसिस, रक्तपेढी, मोबाइल अॅम्ब्युलन्स, कार्डियाक अॅम्ब्युलन्स, डेन्टल हॉस्पिटल सुरू करण्याबाबत चर्चा केली. या सुविधा जनतेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच निर्णय होईल, असे महापौर घोडेले यांनी सांगितले.
दोन तास झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. पूर्णवेळ आरोग्य अधिकारी म्हणून संध्या टाकळीकर यांची नियुक्ती करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.
डॉक्टरांनी पूर्ण वेळ रुग्णालयात थांबावे, सकाळच्या सत्राप्रमाणेच दुपारचे सत्र सुरू केले जाईल. तसेच डायलिसिसची सेवा सिडकोच्या रुग्णालयात सुरू केली जाईल. बन्सीलालनगरात १० खाटांचे रुग्णालय, एक्स-रे मशीन, शवपेटी, स्वर्गरथ यासह अनेक सुविधा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मलेरिया विभागासाठी सरकारकडून आरोग्य अधिका-याची मागणी केली जाणार आहे. सध्या मलेरिया विभागात २० फॉगिंग मशीन, ५ जीपमधील मशीन, दीडशे फवारणी पंप कार्यरत असून, ७० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात
आले आहेत, असे महापौरांनी सांगितले.