देवमूर्ती घडवणारा वाट पाहतोय दैव बदलण्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 08:11 PM2021-02-17T20:11:34+5:302021-02-17T20:13:57+5:30
भारतीय समाजरचनेत गावगाड्यातील बारा बलुतेदारांपैकी एक असलेला पाथरवट (वडार) समाज पूर्वीपासूनच दगडांपासून लेणी, शिल्प, देवांच्या मूर्ती, दगडी मंदिरे, तसेच घरगुती वापराच्या पाटा, वरवंटा, खलबत्ते, इत्यादी साहित्य, कलाकृती बनवून जीवन जगत असे.
- ज्ञानेश्वर चोपडे
आळंद (औरंगाबाद ) : दगडांवर छन्नी-हातोड्याचा घाव घालत देवमूर्ती निर्माण करणाऱ्या पाथरवट समाजाची सध्या दुर्दशा झाली आहे. पूर्वी बारा बलुतेदारांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेला हा समाज दगडांपासून घडविलेले साहित्य विकून उदरनिर्वाह चालवायचा. मात्र, आताच्या काळात घरगुती वापरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने या समाजाला रोजीरोटीसाठी दाही दिशा भटकावे लागत आहे. करोडो लोक ज्यांच्यासमोर रोज नतमस्तक होतात, अशा देवाच्या मूर्तींना घडविणारा हा समाज सध्या अस्तित्वासाठी धडपडतोय.
भारतीय समाजरचनेत गावगाड्यातील बारा बलुतेदारांपैकी एक असलेला पाथरवट (वडार) समाज पूर्वीपासूनच दगडांपासून लेणी, शिल्प, देवांच्या मूर्ती, दगडी मंदिरे, तसेच घरगुती वापराच्या पाटा, वरवंटा, खलबत्ते, इत्यादी साहित्य, कलाकृती बनवून जीवन जगत असे. विशेष म्हणजे त्यांच्याशिवाय गाव अधुरे राहत होते. मात्र कालौघात पारंपरिक साधनांची जागा इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतल्यामुळे या समाजावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे बहुतांश भटका असलेल्या या समाजाला जीवन जगण्यासाठी मोलमजुरी करावी लागत आहे.
शासनाकडून मदतीची अपेक्षा
पाथरवट समाजाचा पारंपरिक धंदा बंद पडण्याच्या मार्गावर असून बहुतांश उत्कृष्ट कारागीर बेरोजगार झाले आहेत. छन्नी-हातोड्यांनी दगडांवर घाव घालून रट्टलेले हात पोटापाण्यासाठी मोलमजुरी करून जीवन जगत आहेत. जे लोक पारंपरिक व्यवसायाला चिकटून बसले आहेत, त्यांची परिस्थिती बिकट आहे. शासनाने या कलाकारांच्या कलेची कदर करून त्यांना मदत करावी. अन्यथा ही कला कालौघात नष्ट होईल. या कारागिरांना शासकीय अनुदान व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळाल्यास त्यांच्या कलेला वाव मिळून समाजाची प्रगती होईल.
पाटा, वरवंट्याला मिळत नाहीत ग्राहक
सध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे जग असून वेगवान व कोणत्याही कष्टाविना गृहिणी मिक्सरवर घरातील मसाले वाटून घेतात. पाटा, वरवंट्यावरील चव ही कितीही चांगली असली, तरी कष्ट घेण्याची तयारी नवीन पिढीमध्ये नसल्याने पाथरवटांच्या पाटा, वरवंट्याला मागणी घटली आहे. एव्हाना ती नसल्यातच जमा आहे. यामुळे या समाजावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
कष्टाचे काम
पाथरवट समाज मोठमोठ्या दगडांवर घाव घालून आपल्या कलेचा वापर करून मूर्ती, पाटा, वरंवटा घडवितात. मात्र आता खाणीतून दगड आणणेही महाग झाले आहे. तसेच दगडांवर कित्येक तास हातोड्याचे घाव घालून या वस्तू घडविण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते. त्यामानाने या वस्तूंना मागणी तर नाहीच. मात्र जे ग्राहक मिळतात तेही अत्यंत कमी किमतीत या वस्तू मागतात. यामुळे पाथरवट समाज अडचणीत सापडला आहे.
आमच्या कलेची शासन दरबारी नोंद नसल्याने ही कला लुप्त होत चालली आहे. शासनाने आमच्या कारागिरांची नोंद घेऊन आम्हाला शासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. - शेषराव धोत्रे, कारागीर.