सिल्लोडमध्ये भाजपने विरोध केला तर शिवसैनिक महाराष्ट्रभर उत्तर देतील;अब्दुल सत्तारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 08:05 PM2024-10-03T20:05:10+5:302024-10-03T20:07:01+5:30
सिल्लोडमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोध करत आहेत
सिल्लोड: सिल्लोड विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना स्थानिक भाजप पदाधिकारी विरोध करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपकडून बंडखोरी होण्याचे चिन्ह दिसत आहेत. यामुळे सिल्लोडमध्ये भाजपाने विरोध केला तर शिवसैनिक महाराष्ट्रात भाजपाला जशास तसे उत्तर देतील, असा इशारा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपाला दिला.
भराडी येथे मिर्ची प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन केल्यानंतर सत्तार यांनी पत्राकरांसोबत संवाद साधला. सिल्लोडमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी तुम्हाला विरोध करत आहेत, यावर सत्तार यांनी प्रतिक्रिया देत भाजपाला इशारा दिला. ते म्हणाले, सिल्लोडमध्ये भाजपवाले जसे काम करतील त्याच पद्धतीने आमचे शिवसैनिक मराठवाडा व महाराष्ट्रात काम करतील. त्यांना जशासतसे उत्तर मिळेल असा, इशारा देत सत्तार यांनी खळबळ उडवून दिली आहे.
विरोधकांपेक्षा भाजपाचा अधिक विरोध
सिल्लोड विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा या महाविकास आघाडीपेक्षा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा अधिक विरोध दिसत आहे. अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध आगामी निवडणुकीत भाजपचा एक बंडखोर अपक्ष उभा राहू शकतो किंवा भाजपचा एखाद्या स्थानिक नेता महाविकास आघाडीत जाऊन लढू शकतो अशी चर्चा आहे. त्यात भरीस भर म्हणून लोकसभा मतदार संघात पराभूत झालेले रावसाहेब दानवे व अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक हल्ले वाढले आहेत. माजी खासदार दानवे स्थानिक नेत्यांना बळ देऊन लोकसभेच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. दानवे समर्थकांनी सत्तार यांच्या विरुद्ध अजिंठा येथे रस्तारोको आंदोलन केले. यावेळी सिल्लोड पाकिस्तान होत आहे की काय असे दानवे बोलले होते. त्यानंतर सत्तार समर्थकांनी निषेध मोर्चा काढत भाजपला धक्का दिल. यामुळे कुरघोडी अधिक वाढत जाऊन भाजपाच्या नेतृत्वात सिल्लोड येथे आक्रोश मोर्चा काढला. आरोप प्रत्यारोप होत असल्याने सिल्लोड विधानसभा मतदार संघात भाजप सेनायुती मध्ये बिघाडीचे चित्र स्पष्ट दिसत आहे.