रक्त हवे, तर आधी रक्तदान करा; रक्ताच्या तुटवड्याने घाटी रक्तपेढीवर नामुष्कीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 04:29 PM2018-05-18T16:29:34+5:302018-05-18T16:32:10+5:30
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीत रक्त व रक्तघटकांचा तुटवडा अधिक तीव्र झाला आहे. तुटवड्याने रक्ताची मागणी घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनाच रक्तदान करा आणि हवे असलेले रक्त घेऊन जा, असा सल्ला देण्याची नामुष्की रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांवर ओढावली आहे.
औरंगाबाद : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीत रक्त व रक्तघटकांचा तुटवडा अधिक तीव्र झाला आहे. तुटवड्याने रक्ताची मागणी घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनाच रक्तदान करा आणि हवे असलेले रक्त घेऊन जा, असा सल्ला देण्याची नामुष्की रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांवर ओढावली आहे.
शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल एका रुग्णाचे नातेवाईक गुरुवारी (दि. १७) रक्तासाठी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रक्तपेढीत दाखल झाले होते. यावेळी रक्तपेढीतील तज्ज्ञांनी रक्त घेण्यासाठी रक्तदान करावे लागेल, असे सांगितले. काही दिवसांपूर्वीच रक्तदान केलेले असल्याने आता रक्तदान करता येणार नाही. सोबत असलेल्या ज्येष्ठ नातेवाईकासही वयामुळे रक्तदान करणे अशक्य आहे. त्यामुळे रक्त कसे मिळवायचे,या विचाराने सदर नातेवाईक रक्तपेढीबाहेर हताशपणे बसून होता. रक्तासाठी दुपारी १२ वाजताही येऊन गेलो होतो, असे या नातेवाईकाने ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
रक्ताच्या टंचाईने असाच अनुभव इतर अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना येत आहे. घाटी रुग्णालयासह कर्करोग रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकांना रक्त, रक्तघटकांची आवश्यकता असते. घाटीतील विभागीय रक्तपेढीमध्ये दररोज जवळपास सुमारे ६० ते ७० बॅग रक्त आणि रक्तघटकांची मागणी आहे; परंतु उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रक्तदानात घट झाल्याने रक्त आणि रक्तघटकांचा पुरवठा करण्यासाठी रक्तपेढीला मोठी कसरत करावी लागत आहे.
रक्तदानाचे आवाहन
रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नागरिक, रक्तदान शिबीर संयोजकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. रक्तदान करून, रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे,असे आवाहन विभागीय रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकारी सुनीता बनकर यांनी केले आहे.