बोगस डॉक्टर आढळल्यास सरपंच, ग्रामसेवकाला जबाबदार धरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 08:24 PM2020-02-04T20:24:11+5:302020-02-04T20:25:18+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे ग्रामीण भागात खळबळ
वाळूज महानगर : ग्रामीण भागात रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आता गावात बोगस डॉक्टर आढळून आल्यास संबंधित गावातील सरपंच व ग्रामसेवकाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
वैद्यकीय शिक्षण नसताना अनेकांनी ग्रामीण भागात अवैधपणे दवाखाने सुरू केले आहेत. ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी घेतात. या बोगस डॉक्टरांचे बड्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांशी लागेबांधे असल्यामुळे हे त्यांच्याकडे आलेले रुग्ण या खाजगी रुग्णालयात रेफर करतात. त्यामुळे बड्या रुग्णालयातील डॉक्टरांकडून या बोगस डॉक्टरांना काही रक्कम दिली जात असल्याचे काही डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करण्याचे आदेश शासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत. ग्रामीण भागात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना गावातील लोक पाठीशी घालत असून, त्यांच्यावर कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारीनंतर जिल्हधिकारी चौधरी यांनी ग्रामीण भागात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील वैद्यकीय शिक्षण अर्हतेबाबत खात्री केल्याशिवाय त्यांना व्यावसायिकांची परवानगी ग्रामपंचायतीने देऊन नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शैक्षणिक अर्हता असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यास अडचण निर्माण झाल्यास तालुका वैद्यकीय अधिकारी व नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेण्याच्या सूचना सरपंच व ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक आढळल्यास त्याची माहिती गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक शोध समिती, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत.
गंगापूर तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींना पत्र देणार
ग्रामीण भागात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी, धामोरी, लासूर व गाजगाव आदी ठिकाणच्या ५ बोगस डॉक्टरांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे. आता तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवारी (दि.४) पत्र देऊन गावातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांची माहिती मागविण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश घोडके यांनी दिली.