रस्त्यावर कचरा टाकल्यास मनपा व्यापाऱ्यांना सरसकट दंड आकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 02:02 PM2018-05-02T14:02:03+5:302018-05-02T14:04:21+5:30
मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
औरंगाबाद : बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांवर दररोज रात्री शेकडो टन सुका कचरा पडून असतो. मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात कचऱ्याची समस्या अत्यंत बिकट आहे. विभागनिहाय कचरा निचरा करण्याच्या निर्णयानंतर मनपाकडून आता शहरातील कचरा व्यवस्थापनावर भर देण्यात येत आहे. यातूनच मनपाने व्यापाऱ्यांकडे होणाऱ्या कचऱ्याकडे मोर्चा वळवला आहे. शहरातील कोणत्याही व्यापाऱ्याकडे कचरा साठविण्यासाठी डसबिन नाही. मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. कुंभारवाड्यात तर नागरिकही रस्त्यावरच कचऱ्याच्या कॅरिबॅग ठेवतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
सोयीसाठी २ वेळा कचरा उचलण्यात येतो
टिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्ली, सिटीचौक, शहागंज, गोमटेश मार्केट आदी भागात रात्री १० नंतर कॅरिबॅग, कागदी पुठ्ठे, विविध मालांवरील पातळ कॅरिबॅग रस्त्यावर फेकून देण्यात येते. व्यापाऱ्यांनीच कचरा रस्त्यावर टाकल्यास शहर कसे स्वच्छ होईल, असा प्रश्न मनपा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक दुकानदाराने सुका कचरा ठेवण्यासाठी डसबिन ठेवल्याच पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी मनपाच्या घंटागाडीकडे हा कचरा दिला पाहिजे. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी दोनवेळा कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतरही कचरा रस्त्यावर येत असेल तर ही फार गंभीर बाब असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी नमूद केले.
दोन लाखाच्या दंडाचे टार्गेट
शहरात कचऱ्याची परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत महापालिका शहर सुंदर, स्वच्छ कसे राहील यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना खीळ बसविण्याचे काम व्यापाऱ्यांकडून होत आहे. व्यापाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रत्येक दुकानदाराला दोन हजार रुपये दंड आकारण्यात यावा, असा निर्णय महापौरांनी घेतला. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना स्वतंत्र पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पथकाने दररोज किमान दोन लाख रुपये दंड वसूल करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. निधी मनपाच्या तिजोरीत आला पाहिजे असेही पदाधिकाऱ्यांनी शेवटी नमूद केले.
दंड लावणे हा उपाय नाही...
व्यापाऱ्यांनी नेहमीच महापालिकेला सहकार्य केले आहे. औषधी भवन येथील व्यापारी आता कचरा कुंडीत किंवा रस्त्यावर टाकत नाहीत. सर्व कचरा एकत्र जमा करून मनपाच्या घंटागाडीकडे देतात. महापालिकेने अगोदर आपली यंत्रणा मजबूत करावी. सकाळी जेव्हा व्यापारी प्रतिष्ठाने उघडतात तेव्हा घंटागाडी फिरवावी. सायंकाळीही उशिरा एक रिक्षा या भागात आल्यास सर्व व्यापारी आपला कचरा त्याला देतील. मनपाने आपली यंत्रणाच मजबूत केलेली नाही. रस्त्यावर किंवा कुठेही कचरा टाकण्यात कोणालाही आनंद होत नाही. मजबुरीने त्याला टाकावे लागते. व्यापाऱ्यांना, नागरिकांना दंड आकारून हा प्रश्न सुटणार नाही.
- अजय शहा, माजी अध्यक्ष, व्यापारी महासंघ