शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी जाते, तर आम्ही का नको; इम्तियाज जलील यांचा पुन्हा प्रस्ताव

By मुजीब देवणीकर | Published: December 27, 2023 01:22 PM2023-12-27T13:22:18+5:302023-12-27T13:25:05+5:30

महाविकास आघाडीत एमआयएमला सामावून घ्या; इम्तियाज जलील यांचा पुन्हा एकदा प्रस्ताव

If Congress-Nationalists go with Shiv Sena, why not us; Again alliance proposal by AIMIMs MP Imtiaz Jalil | शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी जाते, तर आम्ही का नको; इम्तियाज जलील यांचा पुन्हा प्रस्ताव

शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी जाते, तर आम्ही का नको; इम्तियाज जलील यांचा पुन्हा प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीत शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह अन्य घटक पक्ष आहेत. आम्हालासुद्धा त्यांनी सोबत घेतले पाहिजे. प्रसारमाध्यमांमार्फत आम्ही महाविकास आघाडीला हा प्रस्ताव देतोय. त्यांनी चर्चेसाठी बोलवावे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी बोलणी होऊ शकते. शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी जाऊ शकते, तर आम्ही का नको, असा प्रश्न खा. इम्तियाज जलील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी फक्त महाराष्ट्रापर्यंतच बोलू शकतो. इंडिया आघाडीत जायचे किंवा नाही, हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी घेतील. महाराष्ट्रात एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार आहे. भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचे असेल तर आम्हाला सोबत घ्यावे लागेल. आमची राज्यात किती ताकद आहे, हे यापूर्वीच्या निवडणुकांवरून निदर्शनास आले आहे. दीडशे वर्षे जुन्या काँग्रेसने अहंकार बाळगू नये. सध्या राज्यात ते लोकसभेत शून्यावर आहेत. राज्यात आमचा एक तरी खासदार आहे. कोणाला कमी लेखण्यात काही अर्थ नाही. वारंवार आमच्यावर आरोप केले जातात. आम्ही जिथे निवडणुका लढवितो, तेथे भाजपला फायदा होतो. आम्हाला सोबत घ्यायला काय हरकत आहे? सध्या चेंडू महाविकास आघाडीच्या कोर्टात असून, त्यांनी निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने निवडणुका लढण्यास तयार आहोत. एमआयएमला अस्पृश्य समजू नये, असा टोलाही जलील यांनी लगावला.

महाविकास आघाडीकडून काही निरोप आला तर टेबलवर बसून जागा वाटपाबाबत चर्चा होईल. तूर्त आम्ही काहीही म्हणणार नाही. एमआयएम सध्या राज्यात काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष आहे, हे विसरू नये. यांचा पुनरुच्चार त्यांनी केला. खा. जलील यांनी यापूर्वीही एकदा काँग्रेस, राष्ट्रवादीकडे अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला होता, हे विशेष.

Web Title: If Congress-Nationalists go with Shiv Sena, why not us; Again alliance proposal by AIMIMs MP Imtiaz Jalil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.