माध्यमिक, महाविद्यालयाचा प्रयोग यशस्वी झाल्यास प्राथमिकचे वर्ग सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:03 AM2021-01-04T04:03:56+5:302021-01-04T04:03:56+5:30
औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट आलीच नाही. त्यामुळे सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. माध्यमिक ...
औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट आलीच नाही. त्यामुळे सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. माध्यमिक विभागाचे वर्ग यशस्वीरीत्या सुरू झाल्यास प्राथमिक विभागाचे सर्व वर्ग सुरू करण्याचा विचार असल्याचे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.
कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. वर्षअखेरीस काही दिवस तरी शाळा सुरू करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे. ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेतली. विशेष बाब म्हणजे ५० टक्के पालकांनी वर्ग सुरू करण्यास संमती दर्शविली आहे. सोमवारी प्रत्येक शाळेत, महाविद्यालयांमध्ये किमान पन्नास टक्के विद्यार्थी हजर राहतील, असा अंदाज शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुढील पंधरा दिवस माध्यमिक विभागाचे वर्ग सुरळीतपणे सुरू राहिल्यास इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा मानस महापालिका प्रशासनाने व्यक्त केला. शहरातील कोचिंग क्लासेसही अद्यापपर्यंत बंद आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कोचिंग क्लासेस सुरू करण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात येणार असल्याचे पाण्डेय यांनी नमूद केले. शहरातील अनेक शाळांनी ऑनलाइन क्लासेसचा अवलंब केला होता. मात्र, तो फारसा यशस्वी ठरलेला नाही. खाजगी शाळांनी ऑनलाइन क्लासेसच्या नावावर पालकांकडून शंभर टक्के फी वसूल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.