बिल भरावेच लागेल, फुकट वीज दिली तर महावितरण बंद पडेल, खाजगी कंपन्या येतील : नितीन राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 07:20 PM2021-12-17T19:20:21+5:302021-12-17T19:20:50+5:30
Nitin Raut : विजेचा वापर करत असाल तर बिलसुद्धा भरावेच लागेल.
औरंगाबाद : वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कोळसा आणि बँकेचे घेतलेले पैसे भरायचे आहेत. या पुढे वीज कोणालाही फुकट देणार नाही. वीज वापरायची असेल तर बिल भरावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका उर्जामंत्री नितीन राऊत ( Nitin Raut ) यांनी घेतली. तसेच फुकट वीज दिली तर महावितरण (Mahavitaran ) बंद पडेल, यात खाजगी कंपन्या येतील, असा इशाराही राऊत यांनी आज दिला.
उर्जामंत्री नितीन राऊतऔरंगाबादमध्ये आयोजित महावितरणाच्या बैठकीसाठी आज शहरात आले होते. दरम्यान, शेतकरी वीज बिलावरून भाजप आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब यांनी ऊर्जामंत्री राऊत यांची भेट घेतली. भाजप आमदारांनी शेतकऱ्यांकडून थकीत बिल वसुली सक्तीने करू नये, वीज बिलात सूट द्यावी, अशी मागणी केली. यावर राऊत यांनी वीज बिल भरावेच लागेल, अशी भूमिका घेतली. विजेचा वापर करत असाल तर बिलसुद्धा भरावेच लागेल. वीज कुणालाच फुकट मिळणार नाही. कारण, महावितरण फुकटात वीज विकत घेत नाही. कोणत्याही कंपन्या महावितरणला वीज फुकट देत नाहीत. वीज निर्मिती करण्यास खर्च लागतो. यामुळे बिल भरावेच लागेल असे राऊत यांनी स्पष्ट केले.
वीज निर्मितीसाठी पैसे लागतात
वीज निर्मिती करण्यासाठी कंपनांना कोळसा लागतो.त्यांनी बँकांचे कर्ज घेतलेले असते. तर वीज विकत घेण्यासाठी महावितरणला देखील पैसे लागतात. वेळ पडल्यास कर्जही घ्यावे लागते. जर वीज बिल भरले नाही तर महावितरणकडे पैसे नसतील, महावितरण बंद पडेल. यानंतर यात खाजगी कंपन्या येतील, असा इशारा यावेळी उर्जामंत्री राऊत यांनी दिला.
मोर्चा काढू
शेतकऱ्यांना थकीत वीज बिल भरायला लावणे चुकीचे आहे. ओल्या दुष्काळात शेतकऱ्यांनी वीज वापरली नाही, यामुळे शेतकरी चालू बिल भरायला तयार आहेत. दररोज ८ तास देखील वीज मिळत नाही मग कसे भरायचे बिल. शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे. जर रोहित्र बंद केले तर याविरोधात मोर्चा काढावा लागेल, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी दिला.