‘डमी’ मजूर असेल तर कळवा, अन्यथा कारवाईचा बडगा; घाटी रुग्णालयात विभागप्रमुखांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 04:03 PM2024-09-06T16:03:22+5:302024-09-06T16:03:48+5:30
घाटी रुग्णालयातील विभागप्रमुखांसह जमादार, स्वच्छता निरीक्षकांना नोटिसा
छत्रपती संभाजीनगर : घाटीत महिला एक्स-रे टेक्निशियनने कामावर ठेवलेल्या कर्मचाऱ्याने एक्स-रे काढताना एका तरुणीसोबत असभ्य वर्तन केल्याचा प्रकार घडल्यानंतर घाटी प्रशासनाला ‘डमी’ कर्मचाऱ्यांसंदर्भात जाग आली आहे. कोणी डमी मजूर काम करीत असेल तर तत्काळ रुग्णालय प्रशासनाला कळवावे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशा नोटिसा विभागप्रमुखांसह जमादार, स्वच्छता निरीक्षकांना काढण्यात आल्या.
घाटी रुग्णालयात काही कर्मचाऱ्यांकडून काही रक्कम देऊन इतरांनाच कामावर पाठविण्याचा प्रकार होतो. हा प्रकार ‘लोकमत’ने २७ मे २०२३ रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला होता. तत्कालीन अधिष्ठातांनी याप्रकरणी कारवाई केली जाईल, असे जाहीर केले. परंतु, वर्षभर या ‘डमी’ मजुरांकडे कानाडोळाच झाला. एक्स-रे काढताना झालेल्या विनयभंगाच्या घटनेनंतर घाटीतील हे ‘डमी’ कर्मचारी गायब झाले. घाटी प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत ‘डमी’ कर्मचारी आढळला तर जमादार, स्वच्छता निरीक्षक यांना जबाबदार धरण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.
आजारी असेल स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय
कर्मचारी आजारी आहे, काम करण्यास अडचण येत असेल अशांना वैद्यकीय मंडळाला पाठविले जाईल. अशा कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेता येते. त्यांच्या पाल्याला अनुकंपा तत्त्वावर घेता येते.
-डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता
नोटिसा दिल्या
घाटीतील कर्मचाऱ्यांऐवजी इतर दुसरेच कर्मचारी कामावर येत असतील, कळविण्यात यावे, यासंदर्भात विभागप्रमुखांना जनरल नोटीस काढल्या आहेत.
-डॉ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक