अर्धे अर्धे ठरले, तर मग वसूल कराचा आमचा वाटा कुठेय? जिल्हा परिषदेचा एमआयडीसीला प्रश्न
By विजय सरवदे | Published: December 5, 2023 01:43 PM2023-12-05T13:43:22+5:302023-12-05T13:43:49+5:30
उद्योगांकडून वसूल होणाऱ्या करापैकी ग्रामपंचायतीच्या वाट्याला ५० टक्के रक्कम देण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
छत्रपती संभाजीनगर : वाळुज, शेंद्रा व लगतच्या १४ ग्रामपंचायत क्षेत्रांत जवळपास दोन हजार उद्याेग आहेत. त्यांच्याकडील करवसुलीसाठीएमआयडीसीने फक्त दोन कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींसमोर पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे वसूल करण्यात आलेल्या कराच्या वाटणीचा मुद्दाही गुलदस्त्यात आहे. उद्योगांकडून वसूल होणाऱ्या करापैकी ग्रामपंचायतीच्या वाट्याला ५० टक्के रक्कम देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत यांनी उद्योगांकडील मालमत्ता कराच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतनिहाय दोन-दोन कर्मचारी नियुक्त करावेत, तसेच एप्रिल २०२३ पर्यंतची थकबाकी आणि मागणीनुसार आतापर्यंतच्या वसुलीबाबतचा अहवाल सादर करण्याचे पत्र एमआयडीसीला दिले आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर या दोन तालुक्यांत १४ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील उद्याेगांची संख्या मोठी आहे. १९ जुलै २०२३ रोजी एमआयडीसीचे उपअभियंते व मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यात झालेल्या बैठकीत उद्योगांकडील करवसुलीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत एमआयडीसीचे दोन-दोन कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आजपर्यंत फक्त दोन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एमआयडीसीने एकही कर्मचारी नियुक्त केलेला नाही. आता या संदर्भात पंचायत विभागाने आणखी एक स्मरणपत्र एमआयडीसीला दिले आहे.
एमआयडीसी क्षेत्राबाहेर नऊ तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींची वसुली मात्र, समाधानकारक असल्याचे आकडेवारीवरून दिसते. आतापर्यंत थकबाकी आणि चालू मागणीपैकी ४५.६१ टक्के वसुली झाली आहे. मार्च २०२३पर्यंत जवळपास सर्वच ग्रामपंचायतींकडे ३ कोटी ८२ लाख ३२ हजार रुपये मालमत्ता कराची थकबाकी, तर चालू मागणी ४३ कोटी ४२ लाख २६ हजार एवढी होती. त्यापैकी ऑक्टोबरअखेर १ कोटी ६९ लाख ५७ हजार रुपये थकबाकी आणि १९ कोटी ८५ लाख २ हजार एवढी चालू मागणीची वसुली झाली आहे.
एमआयडीसी हद्दीतील ग्रामपंचायती
गंगापूर तालुक्यातील वाळूज, घाणेगाव, जोगेश्वरी, रांजणगाव शेणपुंजी, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात वडगाव कोल्हाटी, तिसगाव, पंढरपूर, कुंभेफळ, शेंद्रा कमंगर, शेंद्रा बन, लाडगाव हिवरा, वळदगाव, पाटोदा आणि इटावा अशा १४ ग्रामपंचायतींच्या हद्दीत उद्योग आहेत. सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांत एमआयडीसीने उद्योगांकडून ६ कोटी ६० लाख ७५ हजार रुपये करवसुली केली आहे.