प्रेम करणे, विश्वास ठेवणे हीच अन्यायाची परिभाषा असेल तर हा अन्याय आम्ही केलायं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 07:14 PM2022-07-22T19:14:48+5:302022-07-22T19:15:49+5:30
प्रेमाने मिठी मारल्यानंतर त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. यात आमचे काय चुकलं?
वैजापूर (औरंगाबाद) : त्यांना निवडणुकीत तिकीटे दिली. आमदारकी, मंत्रिपदे दिली. भरभरून प्रेम दिले. मात्र, प्रेमाने मिठी मारल्यानंतर त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. यात आमचे काय चुकलं? असा सवाल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वैजापुर येथे आयोजित जाहीर सभेत केला.
राज्यातील आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित संवाद यात्रेसाठी ते वैजापुरात आले होते. त्यांच्यासोबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी मिसाळ, संजय पाटील निकम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटात सामील झालेल्या चाळीस आमदारांवर टिकेची झोड उठवली. त्यांना पक्षाच्या माध्यमातुन ख्याती मिळवून दिली. आमदारकी, मंत्रीपदे दिली. मग यात आमचे काय चुकले? भरभरुन प्रेम करणे, विश्वास ठेवणे हीच अन्यायाची परिभाषा असेल तर हा अन्याय आम्ही केला आहे. तसेच हिम्मत असेल तर बंडखोर आमदारांनी राजीनामा द्या व पुन्हा जनतेसमोर या, जनतेचा न्यायनिवाडा आम्हाला मान्य असेल, असे खुले आव्हान देखील ठाकरे यांनी केले.