महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेच्या रक्कमेत वाढ करू: संजय राऊत
By बापू सोळुंके | Published: August 13, 2024 06:53 PM2024-08-13T18:53:07+5:302024-08-13T18:53:23+5:30
एकनाथ शिंदे हा भावनाशून्य माणूस असल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर: राज्य सरकारने आणलेल्या योजना या बहिणींसाठी नसून आगामी विधानसभा निवडणुकीत मते विकत घेण्यासाठी असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. आमचे सरकार आल्यावर या योजनेच्या रक्कमेत वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भाच्या दौऱ्यावर जाण्यासाठी खा.राऊत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकांची मुदत संपून तीन ते पाच वर्ष उलटत आहेत. मात्र या निवडणूका घेतल्या जात नाही. आता राज्यातील वातावरण प्रतिकूल असल्याने आगामी विधानसभा निवडणूक घेण्याची हिम्मत नाही, पण नाईलाजास्तव त्यांना या निवडणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे खा.राऊत म्हणाले. पंतप्रधानांना देशभर सभा घेता याव्यात, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तारखा मॅनेज केल्या होत्या. मात्र महाराष्ट्रातील विरोधीपक्ष आणि जनता जागरूक असल्याने या सरकारला निवडणूक घेताना कोणताही घोळ घालता येणार नाही. आणखी काही योजना आणण्यासाठी राज्यसरकार विधानसभा निवडणूक एक महिना पुढे ढकलणार असल्याची चर्चा आहे, याकडे तुम्ही कसे पाहता या प्रश्नाचे उत्तर देताना खा.राऊत म्हणाले की, सर्व प्रतिकूल परिस्थिती त्यांच्यासाठी आहे. त्यांनी जाहिर केलेल्या योजना बहिणींसाठी नसून मते विकता घेण्यासाठी असल्याचा आरोप केला. आमदार रवी राणा यांनी मते न केल्यास लाडक्या बहिण योजनेचे पैसे परत घेतल्या जाईल, असे विधान केल्याकडे खा.राऊत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, ही यांची खरी मानसिकता आहे. पैसे का त्याच्या बापजाद्यांचे आहेत का, असा सवाल करीत हे पैसे लाडक्या बहिणींच्या हक्काचे आहेत. एकनाथ शिंदे हा भावनाशून्य माणूस असल्याचेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार आहे. आमचे सरकार आल्यावर लाडक्या बहिण योजनेच्या रक्कमेत वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
आगामी विधानसभेत गद्दार आमदार दिसणार नाही
योजनांविषयी यांचा हेतू चांगला नाही. यामुळे बारामतीमध्ये लाडक्या बहिणींनी अजीतदादांना आधीच पराभूत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षातील गद्दार दिसणार नाही,असेही शिवसेना नेते म्हणाले.
उद्धव ठाकरेपेक्षा चांगला चेहरा काँग्रेसकडे आहे का
मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल या प्रश्नाचे उत्तर देताना खा. राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेपेक्षा चांगला चेहरा आहे का,असेल तर काँग्रेसने दाखवावा, असेही राऊत म्हणाले.