रेल्वेत मोबाईल चोरी गेला तर, टीसी दाखल करून घेणार गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 04:35 PM2021-12-08T16:35:56+5:302021-12-08T16:37:32+5:30
mobile stolen in the train : रेल्वेतून उतरण्याची गरज नाही, प्रवास पूर्ण झाल्यानंतरही करता येते तक्रार
औरंगाबाद : रेल्वे प्रवासात मोबाईल किंवा इतर वस्तू चोरीला गेली तर गाडीखाली उतरून रेल्वे पोलिसांत जाण्याची आता गरज नाही. टीसी किंवा रेल्वे पोलीस रेल्वेतच गुन्हा दाखल ( TC will file a mobile stolen case in Train ) करून तो जीआरपीकडे वर्ग करतात. त्याबरोबर प्रवासाच्या निश्चितस्थळी पोहोचल्यानंतरही प्रवाशांना गुन्हा दाखल करता येतो.
रेल्वे प्रवास करताना अनेकदा मोबाईल, पाकीट, सामान चोरीला जाते. अशावेळी प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर उतरून तक्रार देण्याचा सल्ला दिला जातो. त्यात प्रवासाचे नियोजन बिघडून जाते. परंतु आता रेल्वेतून न उतरताही प्रवाशांना तक्रार देणे शक्य आहे.
देशात कुठेही तक्रार दाखल करणे शक्य
ज्या हद्दीत गुन्हा घडला, तेथेच तक्रार द्यावी, असे नाही. देशात कोठेही तक्रार दाखल करता येते. कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ती गुन्हा घडलेल्या संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग केली जाते. अशाचप्रकारे कोणत्याही रेल्वेस्टेशनवरील लोहमार्ग पोलीस ठाण्यात प्रवाशांना तक्रार देता येते.
कोरोनाकाळात चोरीच्या घटना घटल्या
गतवर्षी मार्चमध्ये कोरोना सुरू झाल्यानंतर रेल्वे बंद करण्यात आल्या. त्यानंतर जून २०२० पासून टप्प्या-टप्प्यांत रेल्वेगाड्या सुरू झाल्या. प्रवासासाठी आरक्षित तिकीट बंधनकारक करण्यात आले. शिवाय स्टेशनमध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यावर भर देण्यात आली. त्यामुळे कोरोनाकाळात रेल्वेत चोरीच्या घटना होण्याचे प्रमाण कमी झाले.
प्रवाशांचा वेळ वाचणार, तपासही जलद
रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान १३९ या क्रमांकावरही तक्रार देता येते. त्याबरोबर ट्विटरच्या माध्यमातून प्रवाशांना तक्रार करता येते, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातून प्रवाशांचा कागदोपत्री तक्रार करण्यात जाणारा वेळ वाचतो शिवाय तपासही जलद गतीने होण्यास मदत होते.
टीसींकडे असतो अर्ज
रेल्वेतील टीसींकडे असलेला अर्ज भरून प्रवाशांना त्यांची तक्रार देता येते. हा अर्ज लोहमार्ग पोलीस ठाण्यात येतो. त्यावरून तपास केला जातो. काही वेळेस माहिती अपुरी असेल तर प्रवाशाकडून अधिकची माहिती घ्यावी लागते. त्याबरोबर प्रवाशांना ऑनलाईन पद्धतीने आणि इतर कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार देता येते. ती तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग होते, असे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.