नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले, तर देशाचे ऐक्य धोक्यात येईल : भालचंद्र मुणगेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 02:11 PM2021-05-17T14:11:13+5:302021-05-17T14:14:12+5:30
या देशातल्या गरिबांचाही न्यायालयावर विश्वास आहे. तो ज्या दिवशी उडेल, तेव्हा अराजकता माजेल,
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले, तर देशाचे ऐक्य, प्रगती, सलोखा आणि स्वातंत्र्य धोक्यात येईल, अशी भीती अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. तसेच कम्युनिस्टांना मोडीत काढायचे या एकाच हेतूने त्यांनी बंगालमध्ये ठाण मांडले. कोरोना संसर्गाच्या काळातही जाहीर सभा घेणे आणि कुंभमेळा भरवण्यास परवानगी देणे, ही घोडचूक असल्याचे ते म्हणाले.
लोकसंवाद प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी डॉ. मुणगेकर यांचे ‘वर्तमानातील राजकारण’ या विषयावर व्याख्यानाचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. या संवादमालेच्या सुरुवातीला काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व्याख्यानाची सुरुवात करताना डॉ. मुणगेकर म्हणाले, अकराव्या पंचवार्षिक योजनेत काँग्रेसने माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि अन्नसुरक्षेचा अधिकार दिला. मात्र, हे लोकांपर्यंत घेऊन जाण्यात काँग्रेस अपयशी ठरली. ही पोकळी मोदींनी भरून काढली आणि फायदा करून घेत सत्ता मिळवली. कोरोनाबाबत राहुल गांधींनी फेब्रुवारीमध्येच इशारा दिला होता; पण मोदींनी तेव्हा हा सल्ला ऐकला नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सूचना केल्या. त्या पत्राला उत्तर देण्याचं सौजन्यही मोदींनी दाखवलं नाही. उलट केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी त्यांची खिल्ली उडवली. कोरोनाची साथ ज्या पद्धतीने हाताळली जात आहे, ती पद्धत अतिशय भयंकर आहे, अशी टीकाही डॉ. मुणगेकर यांनी केली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही सरकारवर हलगर्जीपणाचा आरोप केल्याचा हवालाही त्यांनी दिला.
तेव्हा अराजकता माजेल
तर न्यायव्यवस्था कोसळली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचे सांगतात. या देशातल्या गरिबांचाही न्यायालयावर विश्वास आहे. तो ज्या दिवशी उडेल, तेव्हा अराजकता माजेल, अशी भीती डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसंवादचे अध्यक्ष डाॅ. राजेश करपे यांनी केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी केले.