ग्रामीणमध्ये २५ पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास कोविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:04 AM2021-05-18T04:04:12+5:302021-05-18T04:04:12+5:30
औरंगाबाद : शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे गंभीर रुग्ण आढळत असून, मृत्यू संख्या वाढते आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत २५ किंवा ...
औरंगाबाद : शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे गंभीर रुग्ण आढळत असून, मृत्यू संख्या वाढते आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत २५ किंवा त्यापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळतील, तेथे प्रशासनाने ताबडतोब कोविड केअर सेंटर सुरू करावे, असे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. नादुरुस्त व्हेंटिलेटर, कोरोनाचा प्रादुर्भाव, नियंत्रण, उपाययोजना, लसीकरण मोहीम, खासगी रुग्णालये आकारत असलेले वाढीव बिले, ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती, तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर जबाबदारी सोपवावी, त्यासाठी त्यांना मदत करावी. लसीकरण सुरळीत होण्यासाठी लसींचा पुरवठा कसा वाढेल. याकडे लक्ष दिले जाईल, असेही ते म्हणाले. खासगी रुग्णालये राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारत असतील तर ऑडिटरमार्फत त्याची कडक तपासणी करावी. रुग्णांची लूटमार होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.
बैठकीस रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जि. प. अध्यक्षा मीना शेळके, खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अंबादास दानवे, सतीश चव्हाण, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. नीता पाडळकर उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींच्या मागण्या व सूचना अशा
राज्यमंत्री सत्तार म्हणाले, कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लग्न, साखरपुडा, अंत्यविधीकरिता होणाऱ्या गर्दीवर गांभीर्याने लक्ष द्यावे.
खा. जलील यांनी नादुरुस्त व्हेंटिलेटरप्रकरणी संबंधित पुरवठा एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यासह लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे, दंत महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी केली.
आ. शिरसाट यांनी घाटीतील रिक्त पदे भरावीत अशी, तर आ. चव्हाण यांनी नादुरुस्त व्हेंटिलेटर परत करण्याची सूचना केली. आ. दानवे यांनी मुंबईच्या धर्तीवर जिल्ह्यात लसीकरण करण्याची मागणी केली. आ. बोरनारे यांनी वैजापूर तालुक्यात, तर आ. राजपूत यांनी कन्नडमध्ये रुग्णवाहिका देण्याची मागणी केली.