एक क्रमांक ब्लॉक केला तर पोलीस निरीक्षक दुसऱ्या क्रमांकावरून पाठवायचा अश्लील संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 07:59 PM2019-04-10T19:59:21+5:302019-04-10T20:00:58+5:30
विवाहितेला अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवून त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
औरंगाबाद : विवाहितेला अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवून त्रास दिल्याप्रकरणी सोमवारी रात्री जवाहरनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक हनुमंत गिरमेंविरुद्ध गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गिरमे यांच्याकडून अश्लील मेसेज येत असल्याने विवाहितेने त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. एक नंबर ब्लॉक झाल्यानंतर दुसऱ्या नंबरवरून गिरमे यांनी विवाहितेला मेसेज पाठविल्याचे चौकशीत समोर आले.
जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या विवाहितेचा मोबाईल नंबर मिळवून तिच्या व्हॉटस्अॅपवर अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठविल्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला. हा गुन्हा नोंद होऊ नये, याकरिता चार दिवसांपासून विवाहितेच्या घरी काही लोक दबाव टाकण्याकरिता गेले होते.
याविषयीची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली; मात्र विवाहिता आणि तिचे कुटुंब तक्रार करण्यावर ठाम होते, यामुळे गिरमेंविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. विवाहितेच्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक गिरमे यांच्याकडून तिला अश्लील मेसेज येण्यास सुरुवात झाल्यांनतर तिने त्यांना असे मेसेज पाठवू नका, असे स्पष्टपणे बजावले होते; मात्र गिरमेंकडून मेसेज येणे सुरूच राहिल्याने विवाहितेने गिरमेंना शिवीगाळ करून त्यांचा मोबाईल क्रमांक व्हॉटस्अॅपवर ब्लॉक केला.
यानंतरही गिरमे यांनी त्यांच्या दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून विवाहितेला मेसेज पाठविणे सुरू केले. यामुळे विवाहितेने दुसरा क्रमांकही ब्लॉक केला. त्यानंतर गिरमे यांनी विवाहितेच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज पाठविल्याचे समोर आले. ही माहिती विवाहितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सहायक पोलीस आयुक्तांकडे तपास
गिरमेंविरुद्ध सोमवारी मध्यरात्री दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास उस्मानपुरा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ.राहुल खाडे यांनी दिली. ते म्हणाले की, या तक्रारीची प्राथमिक चौकशी आपण स्वत: करीत आहोत. प्राथमिक चौकशीचा अहवाल पोलीस आयुक्तांना सादर केल्यानंतर गिरमे यांची खातेनिहाय चौकशी, निलंबन याबाबतचा निर्र्णय पोलीस आयुक्त घेतील.