खड्डे बुजवता येत नसतील तर 'साडी नेसा व घरी बसा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 07:12 PM2019-09-06T19:12:13+5:302019-09-06T19:19:24+5:30
अनोख्या आंदोलनात महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया
वाळूज महानगर : रांजणगावच्या त्रिमूर्ती कॉलनीतील रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे गुरुवारी महिला व नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी महिलांनी रस्त्यावर साड्या बांधून ग्रामपंचायतीचा निषेध केला.
या वसाहतीतील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे त्रिमूर्ती कॉलनीतील रस्त्यावर पाणी साचले आहे. दुचाकीस्वार व वाहनधारकांना खड्डे दिसत नसल्यामुळे अपघात वाढले आहेत. या भागातील रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. गतवर्षीही शिवसेनेच्या वतीने गाढवांच्या मदतीने गावातील खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. मात्र, अनेक वसाहतीतील रस्त्याचा प्रश्न निकाली न निघाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी सेनेचे विभागप्रमुख कैलास हिवाळे, शहरप्रमुख रावसाहेब भोसले, जावेद शेख, भगवान साळुंके, विशाल काळे, बंडू तरटे, अर्जुन जाधव, अशोक लोहकरे आदींनी गावातील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला होता.
रस्त्यावर साड्या बांधून निषेध
त्रिमूर्ती कॉलनीतील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या वसाहतीतील नागरिकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याचा प्रश्न निकाली निघत नसल्यामुळे गुरुवारी या वसाहतीतील महिलांनी रस्त्यावर ठिकठिकाणी साड्या बांधून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला. रस्त्याचे काम पदाधिकाऱ्यांना करता येत नसेल, तर साडी नेसा व घरी बसा, अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या.
या प्रकाराची माहिती मिळताच उपसरपंच अशोक शेजूळ, सदस्य सुभाष सोनवणे, ज्ञानेश्वर वाघचौरे आदींनी या वसाहतीला भेट देऊन तूर्तास मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले. येथील रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रकही मंजूर असून निविदा मंजूर होताच सिमेंट रोड केले जाणार असल्याचे उपसरपंच शेजूळ यांनी सांगितल्यामुळे महिलांनी रस्त्यावरील साड्या काढून घेतल्या. याविषयी सरपंच संजीवनी सदावर्ते म्हणाल्या की, पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असून, गणपतीची स्थापना करण्यापूर्वीच अनेक वसाहतीतील खड्डे बुजविण्यात आले आहेत. गाव मोठे असल्यामुळे टप्प्याटप्प्याने रस्त्याचे काम करण्यात येत आहेत.