दुकान उघडे दिसले, तर भरा १० ते २५ हजार रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:03 AM2021-05-23T04:03:52+5:302021-05-23T04:03:52+5:30
औरंगाबाद : संचारबंदीत शेवटच्या आठ दिवसांत अत्यंत कडकपणे अंमलबजावणी करण्यासाठी शनिवारी सकाळी युद्धपातळीवर महापालिकेने दहा पथके तयार केली. कोरोना ...
औरंगाबाद : संचारबंदीत शेवटच्या आठ दिवसांत अत्यंत कडकपणे अंमलबजावणी करण्यासाठी शनिवारी सकाळी युद्धपातळीवर महापालिकेने दहा पथके तयार केली. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले. दिवसभरात पथकांनी शहरात वेगवेगळ्या भागात कारवाई केली. छोट्या दुकानदारांना १० तर मोठ्या दुकानदारांना २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला.
राज्य शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्याशिवाय विनाकारण फिरण्यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु या नियमांचे पालन होत नसल्याचे लक्षात आले आहे. संचारबंदीच्या काळातदेखील काही भागातील अनेक दुकाने उघडी राहतात, खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करतात. त्यामुळे मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शनिवारी सकाळी कारवाईसाठी दहा पथके, चाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. प्रत्येक झोनसाठी सिलिंगचे साहित्य आणि एक गाडी तयार देण्यात आली. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकाने, विविध आस्थापना आणि नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले. दिवसभरात पथकांनी वेगवेगळ्या भागात कारवाईचा बडगा उगारला. काही ठिकाणी दुकाने सील करण्यात आली.
अहवाल सादर करावा
सर्व पथकप्रमुखांनी घनकचरा विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्याकडे रात्री नऊच्या नंतर रोजच्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असेदेखील आदेशात नमूद करण्यात आले आहे. या कारवाईची माहिती रात्री उशिरा संकलित होणार असल्याचे भोंबे यांनी सांगितले.