पहिले लग्न कायदेशीररीत्या संपुष्टात आले नसेल तर दुसऱ्या पत्नीस पेन्शनचा हक्क नाही
By प्रभुदास पाटोळे | Published: April 8, 2024 01:53 PM2024-04-08T13:53:40+5:302024-04-08T13:55:54+5:30
हिंदू विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करणे बेकायदेशीर-खंडपीठाचा निर्वाळा
छत्रपती संभाजीनगर : पहिले लग्न कायदेशीररीत्या संपुष्टात आले नसेल तर दुसऱ्या पत्नीस कौटुंबिक निवृत्तिवेतनाचा हक्क नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. आर. एम. जोशी यांनी दिला. त्याचप्रमाणे हिंदू विवाह कायद्याच्या कलम ११नुसार पहिली पत्नी जिवंत असताना व पहिले लग्न कायदेशीररीत्या संपुष्टात आले नसेल, तर दुसरे लग्न करणे बेकायदेशीर असल्याचे खंडपीठाने निकालात नमूद केले आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामधील इस्लामपूर येथील ग्यानबाई देवीदासराव कोंडगीर यांचे लग्न १९७५ साली देवीदासराव कोंडगीर यांच्यासोबत झाले होते. या विवाहातून त्यांना एक मुलगा झाला होता. देवीदासराव अहमदपूर येथील भूमिअभिलेख कार्यालयात सर्वेअर होते. १७ मार्च २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.
पहिली पत्नी ग्यानबाई जिवंत असताना व पहिले लग्न संपुष्टात आले नसताना देवीदासराव यांनी शोभाबाईसोबत बेकायदेशीरपणे दुसरे लग्न केले होते. देवीदासराव यांनी पोटगीच्या प्रकरणात याचिकाकर्ती ग्यानबाई ही त्यांची एकमेव पत्नी असल्याचे मान्य केले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी दुसरे लग्न केले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. खंडपीठाने दुसरी पत्नी शोभाबाई यांचा मृत देवीदासराव यांच्यासोबत विवाह झाला असल्याचे कथन पुराव्याअभावी फेटाळले होते. पहिली पत्नी ग्यानबाईलाच कौटुंबिक निवृत्तिवेतन मिळण्याचा अधिकार असल्याचा निकाल दिला. सदर याचिकेवर निकाल देताना खंडपीठाने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे संदर्भ दिले आहेत. याचिकाकर्तीतर्फे ॲड. बालाजी बी. येणगे यांनी, तर शासनातर्फे सहायक सरकारी वकील पवन के. लखोटिया यांनी काम पाहिले.