घरकुल पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांकडून करणार पैसे वसूल !
By विजय सरवदे | Published: July 18, 2024 08:01 PM2024-07-18T20:01:26+5:302024-07-18T20:01:57+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६७ हजार घरकुले मंजूर : बांधली ४९ हजार ४४४ घरकुले
छत्रपती संभाजीनगर : घरकुल बांधकामासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने (डीआरडीए) पहिला हफ्ता जमा केला; पण काही लाभार्थ्यांनी घरकुल उभारण्याची सुरुवातही केलेली नाही. त्यांना गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांच्या माध्यमातून लवकरात लवकर घरकुल बांधकामाला सुरुवात करावी म्हणून नोटिसा दिल्या असून येत्या १५ दिवसांत घरकुल बांधकामाला सुरुवात न केल्यास पैसे परत करण्याचा निर्वाणीचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यात पंतप्रधान घरकुल योजना, रमाई घरकुल योजना आणि शबरी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. सन २०१६-१७ ते २०२३-२४ पर्यंत पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत ३६ हजार ७२ घरकुले मंजूर केली, रमाई घरकुल योजनेसाठी २६ हजार ६११, तर ‘शबरी’ योजनेमध्ये ४ हजार ५४६ घरकुलांना मंजुरी दिली. या तिन्ही योजनांत ६७ हजार २२९ घरकुले मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत ४९ हजार ४४४ घरकुले पूर्ण झाली आहेत. पहिला हप्ता घेतल्यानंतरही अद्याप ५ हजार ७२२ घरकुले उभारण्याकडे लाभार्थ्यांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे ‘डीआरडीए’ने एक तर घरकुले बांधा अथवा उचलेल्या हप्त्याचे पैसे जमा करा, असा पवित्रा घेतल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
किती घरकुलांना मंजुरी?
प्रधानमंत्री आवास योजना : या योजनेंतर्गत ३६ हजार ७२ घरकुले मंजूर.
रमाई आवास योजनेचे : या योजनेंतर्गत २६ हजार ६११ घरकुले मंजूर.
शबरी आवास योजनेचे : या योजनेंतर्गत ४ हजार ५४६ घरकुले मंजूर.
पहिला, दुसरा हप्ता वाटप
पंतप्रधान घरकुल योजना, रमाई घरकुल योजना आणि शबरी घरकुल योजनेत निवडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला व दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. अनेकांना तिसरा व चौथाही हप्ता दिला आहे.
साडेपाच हजार घरकुले अपूर्ण
पहिला हप्ता बँक खात्यात जमा झाल्यानंतरही पंतप्रधान घरकुल योजनेत ३ हजार ३६९, रमाई घरकुल योजनेत १ हजार ९८६ आणि शबरी घरकुल योजनेत ३६७ असे एकूण ५ हजार ७२२ घरकुले अपूर्ण आहेत.
१५ दिवसांत बांधकाम पूर्ण करा
जुलैअखेरपर्यंत अपूर्ण घरकुलांची कामे पूर्ण करावीत, असे निर्देशन ‘डीआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना दिले आहेत.
...तर रक्कम वसूल केली जाणार
येत्या १५ दिवसांत घरकुलांचे बांधकाम सुरू न केल्यास लाभार्थ्यांकडून दिलेली रक्कम जमा करावी, अशा सूचना गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांना ‘डीआरडीए’ने दिल्या आहेत.