'कायदेशीररीत्या सरकार टिकले नाही तर...'; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली पुढील रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 12:03 PM2022-09-24T12:03:00+5:302022-09-24T12:03:46+5:30

आता नेते नकोत, पक्षात फक्त 'त्यांचे' कार्यकर्तेच आणा; बुथप्रमुखांना चंद्रशेखर बावनकुळेंचा कानमंत्र

'If the government does not survive legally...'; BJP Maha President Chandrasekhar Bawankule said the following strategy | 'कायदेशीररीत्या सरकार टिकले नाही तर...'; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली पुढील रणनीती

'कायदेशीररीत्या सरकार टिकले नाही तर...'; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली पुढील रणनीती

googlenewsNext

औरंगाबाद : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील नेत्यांऐवजी कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात आणा. आगामी लढाई जिंकायची असून, लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थात भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी कार्यकर्ते जोडण्याचा कानमंत्र नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिला. संत एकनाथ रंगमंदिर येथे झालेल्या ९६५ बुथप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत हाेते.

जिल्ह्यातील बुथप्रमुखांनी प्रत्येकी ५० कार्यकर्ते भाजपमध्ये आणावेत. प्रत्येकाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील २५ कार्यकर्त्यांसह २५ इतर कार्यकर्ते पक्षात आणायचे आहेत. त्याचे फोटो व्हॉट्सॲपवर पाठविण्याचे आवाहन करीत बावनकुळे म्हणाले, ‘महापालिका निवडणुका शिंदे गटासोबत युती करूनच लढल्या जातील. कायदेशीररीत्या सरकार टिकले नाही तरी जशी स्थिती येईल, त्यानुसार भाजप व शिंदे गट कोणत्याही निवडणुकीला तयार असेल. लोकसभेत ४५ हून अधिक, तर राज्यात २०० हून अधिक आमदार निवडून येतील. महाविकास आघाडी समोर असली तरी भाजप बुथ कार्यकर्ता ५१ टक्के मतांसाठी तयार असेल. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे २९४ व शिंदे गटाचे ४१ असे एकूण ३३५ सरपंच निवडून आल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. १६ लोकसभा व ९८ विधानसभा मतदारसंघ प्रचाराच्या नियोजनासाठी हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

१२ आमदारांसाठी वैधानिक मंडळांची ढाल
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निर्णयासाठी वैधानिक विकास मंडळांना महाविकास आघाडी सरकारने मुदतवाढ दिली नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. नवीन सरकार सिंचन, विकास मंडळांबाबत निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना कृषिपंप देण्याबाबत सौरऊर्जा योजना राबविण्याबाबत सरकार विचार करीत असल्याचे नमूद केले.

मुंडे यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या
माजी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली असून, त्या नाराज नाहीत. त्यांनी पक्षाच्या विरोधात कोणतेही काम केले नाही. सचिव, मध्य प्रदेश प्रभारी अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत. आमदारकीबाबतचा निर्णय सर्वंकष असतो. बातम्यांमुळे त्यांचे नाव खराब होत असल्याचे आ. बावनकुळे म्हणाले.

महापालिकेत भाजपला डावलले गेले

सहकार मंत्री सावे म्हणाले, ‘भाजप महापालिकेत सत्तेत असूनही मोठा भाऊ, छोटा भाऊ म्हणत डावलले गेले. जिल्ह्यात आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द करण्यात येतील.’ प्रदेशाध्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्याप्रसंगी आमदार हरिभाऊ बागडे, विजया रहाटकर, संजय कोडगे, बसवराज मंगरुळे, प्रवीण घुगे, मनोज पांगरकर, इद्रीस मुलतानी, जालिंदर शेंडगे, शिवाजी दांडगे यांच्यासह शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: 'If the government does not survive legally...'; BJP Maha President Chandrasekhar Bawankule said the following strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.